निर्दोष ठरेपर्यंत समावेश टाळायला हवा होता – अजित पवार

अखेर महिना उलटून गेल्यावर, उशिरा का होईना मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळाला, असे पवार म्हणाले.

निर्दोष ठरेपर्यंत समावेश टाळायला हवा होता – अजित पवार
शिंदे-फडणवीस सरकारमधील नव्या मंत्र्यांचा शपथविधी राजभवन येथे मंगळवारी झाला. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार उपस्थित होते.

मुंबई : उशिरा का होईना राज्याला मंत्रिमंडळ मिळाले, अशी प्रतिक्रिया व्यक्त करतानाच, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आता राज्यातील शेतकऱ्यांचे व इतर समाजघटकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सरकारने कामाला लागावे, असा सल्लाही दिला.

तसेच काही मंत्र्यांवर वेगवेगळय़ा प्रकारचे आरोप आहेत. ज्यांचे निर्दोषत्व सिद्ध झालेले नाही, त्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्याचे टाळले असते, तर बरे झाले असते, असा चिमटाही त्यांनी काढला. राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. राज्यात सरकार अस्तित्वात नसल्यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळू शकली नाही. त्यामुळे  मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार असा सातत्याने अजित पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारत होते. अखेर महिना उलटून गेल्यावर, उशिरा का होईना मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळाला, असे पवार म्हणाले.

भाजपने करून दाखविले : जयंत पाटील  

ज्यांच्या विरोधात संघर्ष केला त्यांनाच बरोबर घेऊन जाणे हे सोपे काम नाही, मात्र ते भाजपने पुन्हा एकदा करून दाखवले आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जे सहकारी निवडले आहेत त्यांनी चांगले काम करावे, आम्ही महाराष्ट्रात विरोधी पक्ष म्हणून उत्तम काम करू व जनतेचे प्रश्न विरोधात बसून सोडवू, असे त्यांनी म्हटले आहे. राज्यात अतिवृष्टीमुळे शेतजमिनीचे तसेच गोगलगायीच्या आक्रमणामुळे पिकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. आता शेतकऱ्यांच्या व सामान्य जनतेच्या प्रश्नांकडे सरकारने लक्ष द्यावे, असे आवाहन पाटील यांनी केले.

राठोड यांचा समावेश दुर्दैवी भाजपच्या चित्रा वाघ संतापल्या, एकेरी उल्लेख

मुंबई : संजय राठोड यांच्या मंत्रिमंडळातील समावेशामुळे भाजप उपाध्यक्षा चित्रा वाघ संतापल्या असून हा निर्णय दुर्दैवी असल्याचे त्यांनी सांगितले. राठोड यांच्याविरोधातील माझी लढाई सुरूच राहणार असून माझा न्यायदेवतेवर विश्वास असल्याचे वाघ यांनी स्पष्ट केले. तसेच वाघ यांनी राठोड यांचा एकेरी उल्लेख केल्याने त्याचीही प्रतिक्रिया उमटली.

भाजप उपाध्यक्ष वाघ यांनीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्णयावर टीकास्त्र सोडल्याने त्यांना कोणाचा पाठिंबा आहे, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. राठोड यांची मंत्रीपदाची शपथ घेतल्यावर वाघ यांनी समाजमाध्यमांवर तीव्र संताप व्यक्त केला. पुण्यातील तरुणी पूजा चव्हाणच्या मृत्यूला राठोड जबाबदार असून त्यांना मंत्रीपद दिले, तरीही माझा लढा सुरूच राहणार आहे. मी एक महिला या नात्याने ही भूमिका घेतलेली आहे, असे वाघ यांनी नमूद केले. मी उच्च न्यायालयात सादर केलेल्या याचिकेवर राज्य सरकारकडून उत्तर मागविण्यात आले आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
प्रादेशिक समतोल साधण्याचा प्रयत्न ; मुंबई-कोकणचा वरचष्मा
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी