scorecardresearch

वादग्रस्त वक्तव्याबाबत भाजपा आमदार राम कदम यांनी व्यक्त केला खेद

विरोधकांनी माझे वक्तव्य मोडतोड करून व्हायरल केले आणि समाजात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला असेही राम कदम यांनी म्हटले आहे

राम कदम (संग्रहित छायाचित्र)
भाजपा आमदार राम कदम यांनी त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याबाबत खेद व्यक्त करत कोणाच्या भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता असे म्हटले आहे. विरोधकांनी माझे वक्तव्य अर्धवट पसरवून संभ्रम निर्माण केला. आदल्या दिवशी पत्रकार दहीहंडीच्या कार्यक्रमाला हजर होते. त्यांनी काहीही आक्षेप घेतला नाही कारण त्यांनी पूर्ण संभाषण ऐकले होते असेही राम कदम यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे आणि निर्माण झालेल्या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी जी क्लिप व्हायरल केली त्यात मी थांबलो आहे, पॉज घेतला. त्यात एका दर्शकाने प्रतिक्रिया दिली, त्याला मी उत्तर दिले. माझे बोलणे संपल्यावर मी पुढे असेही म्हटलो होतो की प्रत्येक घरातली आई, मुलगी, बहिण हे लक्ष्मीचे रूप आहे तिचा मान सन्मान करा ते कोणीही का व्हायरल केले नाही? असाही प्रश्न त्यांनी विचारला आहे. मी जे बोलले त्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो असे राम कदम यांनी म्हटले आहे.

भाजपा आमदार राम कदम यांनी दहीहंडीच्या दिवशी युवकांशी संवाद साधताना वादग्रस्त वक्तव्य केले होते. दहीहंडीच्या दिवशी जमलेल्या युवकांशी संवाद साधत असताना भाजपाचे आमदार राम कदम यांचा ताबा सुटला. ”उद्या मला सांगितलेत की एखाद्या मुलीला प्रपोज केले आहे ती नाही म्हणते. तुमच्या आई वडिलांना समोर आणा ते जर म्हटले की मुलगी पसंत आहे तर तिला पळवून आणेन” असे बेताल वक्तव्य राम कदम यांनी केले. यासंदर्भातला व्हिडिओ राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केला तसेच असे लोक प्रतिनिधी असल्यावर महिला कशा सुरक्षित राहणार असा प्रश्नही उपस्थित केला. ज्यानंतर राम कदम यांच्या व्हिडिओची चर्चा सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांमध्ये चांगलीच रंगली. तसेच राम कदम यांचे वक्तव्य महिलांचा अनादर करणारे आणि निषेधार्ह आहे अशी प्रतिक्रिया उमटली. यानंतर या वादावर पडदा टाकण्यासाठी राम कदम यांनी खेद व्यक्त केला आहे. मात्र त्यांनी अद्याप याप्रकरणी माफी मागितलेली नाही. त्यांनी माफी मागावी अशी मागणी विरोधकांकडून होते आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Opposition leaders are making a 40 second clip viral on twitter thats creating a wrong impression says ram kadam

ताज्या बातम्या