मुंबई : अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मत नोंदविण्यासाठी शिंदे गटाच्या यामिनी जाधव या उभ्या राहिल्या असता त्यांना विरोधी बाकांवरून ईडी.. ईडी अशी घोषणा देण्यात आली. तर मत नोंदविताना काही आमदारांनी चुकीचा क्रमांक नोंदविल्याने गोंधळ उडाला. अध्यक्षपदासाठी आवाजी पद्धतीने मतदान झाले. प्रस्तावाच्या बाजूने व विरोधात अशी मतांची विभागणी केली गेली. आमदारांनी जागेवर उभे राहून क्रमांक सांगून मत नोंदवायचे होते. ही मोजणी करताना काही आमदार गडबडले व त्यांनी चुकीचा क्रमांक नोंदविला. सुरुवातीला रांगेत कशी मोजणी करायची याचा गोंधळ झाला. यामुळे मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांना फेरमतदान करावे लागले. शिंदे गटाच्या यामिनी जाधव या उभ्या राहिल्या असता विरोधी बाकांवरून ईडी., ईडीच्या घोषणा दिल्या गेल्या. त्यांचे पती व मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांची ईडी चौकशी सुरू आहे. त्यातून बाहेर पडण्याकरिताच यामिनी जाधव यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याची चर्चा होती.