मुंबई : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या क आणि ड संवर्गाच्या पदभरतीसाठीच्या परीक्षा घेण्यासाठी ‘एमकेसीएल’ किंवा ‘टीसीएस’ या दोन्ही कंपन्यांच्या निवडीवर विद्यार्थ्यांमार्फत प्रश्नचिन्ह निर्माण केले जात असून या परीक्षा ‘एमपीएससी’मार्फत घेण्याची मागणी पुन्हा जोर धरत आहे. आरोग्य विभागाच्या क आणि ड संवर्गासाठीच्या ६ हजार २०५ पदांसाठीची भरती परीक्षा पेपर फुटल्यामुळे आरोग्य विभागाने रद्द केल्या आहेत. आता या परीक्षा पुन्हा नव्याने घेण्यात येणार असून यासाठी एमकेसीएल किंवा टीसीएस यापैकी एका कंपनीची निवड केली जाणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

‘एमकेसीएल’ने  घेतलेल्या विविध विद्यापीठांच्या परीक्षांमध्ये अनेक गोंधळ झाले आहेत. बऱ्याच ठिकाणी पेपरफुटीच्या घटनाही घडलेल्या आहेत. त्यामुळे या परीक्षेसाठी ‘एमकेसीएल’ची निवड करण्यास एमपीएससी समन्वय समितीने विरोध केला आहे. या परीक्षांमध्ये सुरळीतपणे पार पडण्यासाठी टीसीएससीमार्फत घेण्याची मागणी समितीने केली आहे.  दुसरीकडे काही विद्यार्थ्यांनी ‘टीसीएस’ कंपनीच्या निवडीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. नुकत्याच झालेल्या म्हाडाच्या परीक्षा ‘टीसीएस’ने घेतलेल्या होत्या आणि या परीक्षांच्या आयोजनापासून अनेक गोंधळ झाले होते.