एखाद्या भ्रष्ट अधिकाऱ्याविरुद्ध तक्रार येण्याची वाट न पाहता स्वत:हून पुढे येऊन तक्रारदाराला प्रोत्साहन देऊन कारवाई करण्याच्या राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नव्या प्रमुखांच्या आदेशामुळे सरकारी यंत्रणांतील भ्रष्ट अधिकाऱ्यांची सध्या बोलती बंद झाल्याचे दिसत आहे. या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी तक्रारदारांशी सौजन्याने बोलणे सुरू केले आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर गेल्या दोन-तीन महिन्यांत हा बदल दिसू लागला आहे. याआधी लाचलुचपत प्रतिबंधक खात्यातील अधिकारी त्यांच्याकडे तक्रारदार आला तरच कारवाई करीत असत. तक्रारदारांची संख्या कमी आहे. परंतु आता स्वत:हून कारवाई करण्याचे आदेश दिल्यामुळे कार्यालयात बसून न राहता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांची मुशाफिरी सुरू झाली आहे. नव्या प्रमुखांच्या या आदेशाचा चांगलाच परिणाम झाला असून भ्रष्ट अधिकाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल करण्यासाठी एखाद्या अधिकाऱ्याने लाच मागितल्याचे ध्वनिमुद्रित संभाषण आवश्यक असते. त्यानंतर सापळा रचला जातो. या किचकट पद्धतीमुळे तक्रारदार फारसे पुढे येत नाहीत. याशिवाय लाचेसाठी दिलेली रक्कमही लगेच मिळत नसल्यामुळे अनेक तक्रारदार तयार होत नसत. लाचेसाठी त्रास देणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्याचा शोध घेण्याचे आदेशही नव्या प्रमुखांनी दिले आहेत. त्यामुळे आता कार्यालयात वाट पाहत बसण्यापेक्षा एसीबीच्या अधिकाऱ्यांना काही सरकारी कार्यालयात खेटे घालावे लागत आहेत. मात्र या आदेशामुळे सतर्क झालेले भ्रष्ट अधिकारी आता मध्यस्थाचा मार्ग अवलंबित आहेत.
या बाबत दीक्षित यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, अशा पद्धतीने यंत्रणा राबविण्यासाठी संख्याबळ कमी असले तरी ते कारण पुढे करता येणार नाही. भ्रष्ट अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रारदार पुढे येत नसेल तर आम्ही पुढाकार घेतला पाहिजे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. संजीव दयाळ हे प्रमुख असताना त्यांनी भ्रष्ट अधिकारी तसेच बेहिशेबी मालमत्ते वा घोटाळ्याप्रकरणी खुल्या चौकशीच्या प्रकरणांना वेबसाईटवर प्रसिद्धी दिली होती. या पद्धतीमुळेही भ्रष्ट अधिकारी धास्तावले होते.