चेंबूरमधील ‘आधुनिक दधिची ’चे दातृत्व; मुंबईतील पहिलीच घटना
अवयवदान करण्याबाबत जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असतानाच आता अवयवांबरोबरच आपल्या अस्थींचेही दान करणाऱ्या आधुनिक ‘दधिची’च्या दातृत्वाचा प्रत्यय शीव इस्पितळात आला. चेंबूर येथे राहणाऱ्या विनायक म्हस्के (वय ५८ वर्षे) यांना शुक्रवारी ब्रेनडेड घोषित केल्यानंतर त्यांच्या मृत शरीरातून यकृत, दोन्ही मूत्रपिंडे, डोळे या अवयवांसह अस्थींचेही दान करण्यात आले.
मुंबईमध्ये अशा प्रकारे प्रथमच मृत व्यक्तीच्या शरीरातून अस्थीदान करण्यात आले आहे. या हाडांचा उपयोग प्रत्यारोपण करण्यासाठी तसेच त्यांची पावडर बनवून दातांच्या शस्त्रक्रियेमध्येही केला जात असून यामुळे कमीत कमी ३ ते ४ जणांना जीवनदान मिळणार आहे.
चेंबूर येथील श्रमजीवी नगरमध्ये राहणाऱ्या विनायक म्हस्के यांना छातीत दुखू लागल्यानंतर गुरुवारी येथील सावला इस्पितळात दाखल करण्यात आले होते; परंतु त्याच दिवशी रात्री त्यांच्या मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिनीमध्ये बिघाड झाल्यामुळे मेंदूला रक्तपुरवठा होत नव्हता. त्यामुळे त्यांना मेंदूत रक्तस्त्राव झाला. त्यांना ब्रेनडेड घोषित केले गेले. त्यानंतर त्यांची पत्नी कलावती, मुलगी ललिता व जावई उत्तम अंभोरे यांनी म्हस्के यांच्या शरीरातील अवयवांबरोबरच अस्थीही दान करण्याचा निर्णय स्वयंस्फूर्तपणे घेतला. त्यानंतर सायन इस्पितळाच्या ‘झोनल ट्रान्सप्लांट कॉर्डिनेशन सेंटर’च्या (झेडटीसीसी) डॉक्टरांनी म्हस्के यांच्या मृत शरीरातून यकृत, दोन्ही मूत्रपिंडे, डोळे यांच्याबरोबरच ‘इलियम’ हे हाड व पाच बरगडय़ा प्रत्यारोपणासाठी काढल्या.
नेहमी जिवंत व्यक्तींच्या शस्त्रक्रियांमधून कापण्यात आलेल्या हाडांमधील उती मिळत असतात. परंतु म्हस्के यांच्या अस्थीदानामुळे प्रथमच मृत व्यक्तीच्या शरीरातून अस्थींच्या उती मिळणार असल्याची माहिती टाटा स्मृती इस्पितळातील उती बँकेच्या डॉ. लोगो गज्जीवाला यांनी दिली.
मरावे परी..
यातील यकृत हे ज्युपिटर इस्पितळात एका ६५ वर्षीय महिलेला प्रत्यारोपणासाठी दिले जाणार असून मूत्रपिंडांचा उपयोगही दोन तरुणांच्या शरीरात प्रत्यारोपणासाठी होणार आहे, अशी माहिती केंद्राचे समन्वयक राहुल वासनिक यांनी दिली.