लोकसभा निवडणुकीतील जागावाटपासाठी शिवसेना, भाजप, रिपाई आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना या महायुतीच्या मंगळवारी झालेल्या पहिल्याच बैठकीत सर्व पक्षांमध्ये अधिकाधिक जागा मिळवण्यासाठी रस्सीखेच झाली. त्यामुळे जागावाटपाबाबत एकवाक्यता नसल्याने उद्धव ठाकरे, गोपीनाथ मुंडे, रामदास आठवले, राजू शेट्टी आणि महादेव जानकर यांचा समावेश असलेली एक उच्चस्तरीय समिती स्थापण्याचा निर्णयच होऊ शकला. या समितीचा निर्णय सर्व घटकपक्षांवर बंधनकारक राहणार आहे.
जागावाटपाच्या चर्चेसाठी वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात महायुतीच्या नेत्यांची बैठक झाली. उद्धव ठाकरे, गोपीनाथ मुंडे व रामदास आठवले यांच्याबरोबरच महायुतीत नव्याने सहभागी झालेले राजू शेट्टी व राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर, तसेच पाचही पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते. भाजपचे देवेंद्र फडणवीस, एकनाथ खडसे, विनोद तावडे, शिवसेनेचे मनोहर जोशी, सुभाष देसाई, संजय राऊत तसेच आदित्य ठाकरे, आरपीआयचे अविनाश महातेकर, अर्जुन डांगळे आदी ज्येष्ठ नेतेही बैठकीस उपस्थित होते.
बैठकीत महायुतीच्या नेत्यांमध्ये जागावाटपाबाबत प्राथमिक चर्चा झाली. राजू शेट्टी यांनी आपल्याला चार जागा मिळाव्यात, असा आग्रह धरला. आठवले यांनीही तीन जागा मागितल्या. तर महादेव जानकर यांनी माढा मतदारसंघावर दावा केला. त्यामुळे या मतदारसंघावरून शेट्टी व जानकर यांच्यात रस्सीखेच सुरू झाली आहे. महायुतीत माढाचा तिढा त्रासदायक ठरणार आहे. जागावाटपाचा घोळ पुढे कायम सुरू राहण्याची शक्यता लक्षात घेऊन बैठकीत पाच नेत्यांची समिती स्थापन करण्यात आली. समितीचा निर्णय सर्व पक्षांना बंधनकारक राहील, असे मुंडे यांनी सांगितले.
टोलमुक्त महाराष्ट्राची घोषणा
महायुती सत्तेवर आल्यानंतर महाराष्ट्र टोलमुक्त केला जाईल, अशी घोषणा गोपीनाथ मुंडे यांनी केली.  राज्यातील आघाडी सरकारच्या विरोधात २५ फेब्रुवारीला विराट मोर्चा काढण्याचे ठरविण्यात आले आहे.
उद्धव यांचे मित्रपक्षांना आश्वासन
निवडणुकीत जागावाटपाच्या मुद्यावर खेचाखेची करण्यासाठी नव्हे तर, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत, असे उद्धव ठाकरे म्हणाले. शेट्टी, जानकर यांचा विशिष्ट मतदारसंघांसाठी आग्रह आहे. आठवले यांनी राज्यसभेच्या खासदारकीची अपेक्षा पुन्हा जाहीरपणे बोलून दाखविली. त्याचा संदर्भ देत आपल्यावर पश्चाताप करण्याची वेळ येऊ देणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले.