मुंबई: पावसाने हार्बर मार्ग बंद असल्याने प्रवाशांनी मोनोने जाण्याचा पर्याय स्वीकारला.क्षमतेपेक्षा जास्त वजन झाल्याने मोनो दीड तास बंद पडल्याने अनेक प्रवाशांना त्रास होऊ लगला. अखेर अग्निशमन दलाने गाडीच्या खिडकीची काच तोडून क्रेनच्या मदतीने दोनशे प्रवाशांना सुखरुप बाहेर काढले आणि मोठी दुर्घटना टळली. वडाळ्यावरुन चेंबूरच्या दिशेने जाणारी ही मोनोरेल मंगळवारी सायंकाळी ६.४०च्या दरम्यान म्हैसूर काॅलनी स्थानकानजीक कलंडली आणि त्यानंतर बंद पडली.

मंगळवारी मुसळधार पावसाने हार्बर रेल्वे सेवा बंद असल्याने चेंबूर ते जेकब सर्कलदरम्यान प्रवाशांनी मोनोरेलचा पर्याय स्वीकारला. परिणामी क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी झाले.अतिगर्दीमुळे मोनोरेल कलंडली, गाडीचा वीज पुरवठा खंडीत होऊन बंद पडल्याचे एमएमआरडीएकडून सांगितले जात आहे. प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी बंद मोनोरेल गाडी स्थानकापर्यंत नेण्यासाठी दुसरी मोनोरेल आणली गेली. मात्र गाडी ओढता येत नसल्याने अडचणी वाढल्या.

मेट्रो बंद पडल्यास समोरच्या ट्रॅकवरुन चालत स्थानकापर्यंत, सुरक्षित स्थळी नेता येते. मात्र मोनोरेल मार्गिका खांबावरून आहेत. त्यामुळे मोनोरेल बंद पडल्यास दुसरी मोनोरेल बंद गाडीच्या समोर आणून गाडीला ओढत नजीकच्या स्थानकापर्यंत नेत प्रवाशांना बाहेर काढले जाते. त्यानुसार म्हैसूर काॅलनी स्थानकानजीक गाडी बंद पडल्याची माहिती मिळताच एमएमएमओसीएलच्या अधिकाऱ्यांचे पथक घटनास्थळी पोहचले, बंद गाडी ओढण्यासाठी नेण्यासाठी दुसरी गाडीही आणण्यात आली. मात्र त्याला यश येत नसल्याने अग्निशमन दलाची मदत घेण्यात आली.

प्रवाशांना त्रास

वातानुकुलित यंत्रणा बंद असल्याने अनेक प्रवाशांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. काही प्रवाशांकडून दरवाजा उघडण्याचा प्रयत्न होत होता, पण यामुळे वेगळीच दुर्घटना घडण्याची शक्यता होती. तेव्हा अग्निशमन दलाच्या जवानांनी गाडीच्या खिडकीची काच तोडून प्रवाशांची सुटका केली. मोठ्या क्रेनच्या सहाय्याने प्रवाशांना खाली आणण्यात आले.

अतिरिक्त वजन

गाडीतून अंदाजे २०० प्रवाशांना बाहेर काढण्यात आल्याचे एमएमआरडीएतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. मोनोरेलची वजन पेलण्याची क्षमता १०४ मेट्रिक टन असताना मंगळवारी १०९ मेट्रिक टन इतके वजन होते. या अतिरिक्त वजनामुळे, गाडीतील अतिगर्दीमुळे गाडी कलंडून यांत्रिक संपर्क तुटला,वीज पुरवठा खंडीत होऊन गाडी बंद पडल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. गाडीतून बाहेर काढण्यात आलेल्या प्रवाशांना पालिकेच्या नजीकच्या दवाखान्यात तपासणी करण्यात आली. एकाला केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

एमएमआरडीएकडून बैठक

मंगळवारची घटना अत्यंत गंभीर असून अग्निशमन दलाने प्रवाशांना बाहेर काढले नसते तर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. त्यामुळे या घटनेची दखल एमएमआरडीएने घेतली आहे. त्यानुसार बुधवारी या घटनेच्या अनुषंगाने एमएमएमओसीएलच्या अधिकाऱ्यांना एमएमआरडीएने बैठकीसाठी बोलावले आहे. तर अशा घटना भविष्यात घडू नये आणि घडल्या तर त्या योग्य प्रकारे कशा हाताळाव्यात यावरही चर्चा होणार आहे.

सुचनांकडे प्रवाशांचे दुर्लक्ष

हार्बर सेवा ठप्प असल्याने मोनोरेल स्थानकांवर प्रवाशांची गर्दी वाढली. मोठ्या संख्येने तिकीट घेतलेल्या प्रवाशांना प्रत्येक स्थानकावर सुरक्षा रक्षकांनी रोखून पुढील गाडीत जाण्याचे सांगितले. मात्र प्रवाशी ऐकायला तयार नव्हते आणि क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी गाडीत चढले. त्यामुळेच गाडी बंद पडल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

२०१७ मध्ये मोनोरेलला आग

मोनोरेल सेवेत दाखल झाल्यापासून अपघात, दुर्घटना आणि तांत्रिक बिघाडांची मालिका सुरुच आहेच. यापूर्वी नोव्हेंबर २०१७ मध्ये वडाळ्याहून चेंबूरला जाणाऱ्या मोनोरेलच्या दोन डब्यांना पहाटे ५ वाजून २० मिनिटांनी आग लागली. यात गाडीत प्रवाशी नसल्याने कोणतीही जिवितहानी झाली नव्हती. यात गाडी जळून खाक झाली होती. या दुर्घटनेनंतर ९ महिने सेवा बंद होती.

घटनेची चौकशी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

घटनेची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिले. फडणवीस यांनी एमएमआरडीए, महापालिका व पोलीस आयुक्तांशी संपर्क साधून चर्चा केली.

अग्निशमन दलाचे अधिकारी याठिकाणी दाखल होऊन देखील त्यांना दरवाजा उघडण्यास एक तास लागला होता. त्यामुळे अनेकजणांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला होता. यापुढे मी कधीच या मोनो रेलने प्रवास करणार नाही. मानसी म्हात्रे , प्रवासी