मुंबई : गलवानच्या घटनेनंतर चीनसोबत झालेल्या सीमावादाच्या चर्चावर भारतीय नौदलाच्या व्यूहात्मक प्रभावाचा परिणाम होता, असे ठाम प्रतिपादन करतानाच पाकिस्तान-चीन यांच्या नौदलांतील वाढते सहकार्य हा मात्र चिंतेचा विषय आहे, असे भारतीय नौदलाच्या पश्चिम विभागाचे प्रमुख ध्वजाधिकारी व्हाइस अ‍ॅडमिरल अजेंद्र बहादूर सिंग यांनी स्पष्ट केले.१९७१ च्या युद्धात कराची बंदरात घुसून भारतीय नौदलाने पाकिस्तानी युद्धनौकांना जलसमाधी दिली आणि त्यांचे तेलसाठे उद्ध्वस्त केले. परिणामी पाकिस्तानी नौदलाचे कंबरडे मोडले. त्या शौर्याचे स्मरण म्हणून ४ डिसेंबर हा दिवस प्रतिवर्षी नौदल दिन म्हणून तर आठवडा नौदल सप्ताह म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने ‘आयएनएस कोलकाता’ या स्टेल्थ मार्गदर्शक क्षेपणास्त्र विनाशिकेवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अ‍ॅडमिरल सिंग म्हणाले की, सागरावर कार्यरत असले तरी नौदलाच्या व्यूहात्मक प्रभावाचा परिणाम जमिनीवरील सीमारेखांच्या वाद-चर्चावरही असतो, म्हणून नौदल महत्त्वाचे ठरते. मात्र नौदलाच्या कार्याचा असाही वेगळा महत्त्वाचा परिणाम असू शकतो, याचा लोकांना विसरच पडतो. आपल्या दुखऱ्या बाजूला कुणी लक्ष्य करत असेल तर त्याला त्रासच होईल हे आपण कटाक्षाने पाहायलाच हवे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सागरावर भारतीय नौदलाचा हुकूमत आहे. हे लक्षात घेऊन भारतीय नौदलाने त्या काळात ज्या काही कारवाया हाती घेतल्या व व्यूहात्मक रचना केली त्याचा गलवानोत्तर सीमावाद चर्चावर परिणाम पाहायला मिळतो. त्या काळात नेमके काय घडले, असे विचारता मात्र ती माहिती गोपनीय स्वरूपाची आहे, असे त्यांनी सांगितले. 

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistan china naval cooperation is matter of concern vice admiral ab singh zws
First published on: 04-12-2021 at 02:06 IST