अनधिकृत बांधकामावर कारवाई केल्याचा राग येऊन उल्हासनगर पालिकेतील नगरसेवक पप्पू कलानी याने सोमवारी पालिकेच्या दोन अधिकाऱ्यांना मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने पोलिसांनी मंगळवारी पप्पू कलानी यास अटक केली. न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केली.
याप्रकरणी युवराज भदाणे, डॉ. सागर घोलप या अधिकाऱ्यांविरुद्ध अनधिकृत बांधकामात तडजोड करण्यासाठी एका मध्यस्थामार्फत दोन लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप करणारी तक्रार पप्पू कलानी याने पोलीस ठाण्यात केली आहे. या आरोप-प्रत्यारोपांमुळे पालिका अधिकारी आणि नगरसेवकांमधील वाद पेटण्याची चिन्हे आहेत.
भदाणे, घोलप हे  शहरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करीत होते. महादेव कम्पाऊंडमधील बांधकामावर कारवाई केल्यानंतर पप्पू कलानी व त्याच्या समर्थकांनी या कारवाईत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. दोन्ही अधिकाऱ्यांनाठार मारण्याची धमकी दिली होती. या सर्व तक्रारींच्या मागे महादेव कम्पाऊंडमधील अनधिकृत बांधकाम आहे. हे बांधकाम तोडण्यात येऊ नये म्हणून तेथे राष्ट्रवादी काँग्रेसचा फलक लावण्यात आला. तेथे कारवाई करताना पप्पूसह समर्थकांनी अडथळे आणले. त्यामुळे हे बांधकाम आयुक्तांनी स्वत: पुढाकार घेऊन तोडून टाकावे व शहरात सुरू असलेली झुंडशाही मोडून टाकावी, अशी मागणी ‘कायद्याने वागा’ संस्थेचे अध्यक्ष राज असरोंडकर यांनी केली आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी पप्पू कलानी याची पत्नी ज्योती या शहरातील अनधिकृत बांधकामांच्या विषयावरून उपोषणाला बसल्या होत्या. या पाश्र्वभूमीवर पप्पू कलानी यांनी घेतलेल्या परस्परविरोधी भूमिकेमुळे शहरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.