परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्राचे तीव्र पडसाद उमटत आहेत. भाजपाकडून राज्यभरात देशमुखांच्या राजीनाम्यासाठी आंदोलनं केल जात असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी परमबीर सिंग यांची मुंबई पोलीस आयुक्त पदावरून थेट ठाकरे सरकारला घेरलं आहे. अंबानी यांच्या घराजवळ कुणाच्या सांगण्यावरून स्फोटकं ठेवण्यात आली हे समोर यायचं असेल, तर केंद्र सरकारने याची चौकशी करावी, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांवर केलेल्या आरोपानंतर राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. “गृहमंत्र्याने एखाद्या पोलीस आयुक्ताला दर महिन्याला १०० कोटी रुपये मागितले, असा आरोप पोलीस आयुक्तांनी केल्याची घटना ही राज्याच्याच काय तर देशाच्या इतिहासातील पहिली घटना असेल. मूळात ज्यांनी आरोप केले, ते परमबीर सिंग यांना एक वर्ष झालं आहे. लॉकडाउनमुळे त्यांना १२ कोटी देता आली नसेल, पण गृहमंत्र्यांने अशी गोष्ट सांगणं… गृहमंत्री राज्याचे असतात. राज्यात शहरं किती, त्यांना आयुक्तांना गृहमंत्र्यांनी काय सांगितलं हे अजून समोर आलेलं नाही. त्यामुळे देशमुख यांची कसून चौकशी होणं गरजेचं आहे, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली.

“आपण मूळ विषय विसरत आहोत. सुशांत सिंग प्रकरण बाजूला राहिले आणि लोक मूळ विषय विसरून जातो. अंबानींच्या घराजवळ बॉम्बची गाडी ठेवण्यात आली. आजपर्यंत मी काय सगळेच असा विचार करत होतो की, बॉम्ब अतिरेकी ठेवतात. पण, बॉम्ब पोलीस ठेवतात, असं आपण कधी ऐकलेलं नाही. यात वाझेंना अटक झाली. त्यांची चौकशी सुरू आहे. परमबीर सिंग यांना त्यांच्या पदावरून का हटवलं. त्यांची बदली का केली गेली हे अजून सरकारने सांगितलेलं नाही. सिंग यांचा काही संबंध होता का? त्यांचा त्यात सहभाग होता का? त्यांना त्या पदावरून बाजूला का केलं गेलं. जर त्यांचा सहभाग होता, तर मग त्यांची चौकशी का केली नाही, त्यांची बदली का केली गेली? सरकारने अंगावर आलेली गोष्ट दुसऱ्याच्या खांद्यावर टाकली,” अशी टीका राज यांनी ठाकरे सरकारवर केली आहे.

“मुळात मुकेश अंबानींच्या घराजवळ बॉम्बची गाडी ठेवली गेली हा मूळ विषय आहे, तो विषय मागे पडला आहे? त्या गाडीत सापडलेलं जिलेटीन कुठून आलं? याची उत्तरं अजून का नाही मिळाली? आणि त्यांच्या घराबाहेर बॉम्ब सापडतात आणि ती गाडी पोलिसानी ठेवली असा आरोप आहे, मुळात अशी घटना कोणीतरी वरिष्ठांच्या सांगण्याशिवाय होऊ शकतं का? ही गाडी कोणाच्या सांगण्यावरून ठेवली गेली याचा तपास करण्यासाठी केंद्राने हस्तक्षेप करावा. केंद्राकडून या गोष्टीचा तपास व्हायला हवा. याचा तपास झाला, तर धक्के बसतील असे चेहरे समोर येतील,” असा गौप्यस्फोट राज यांनी केला आहे.

उद्धव ठाकरे-अंबानी घनिष्ठ मित्र

“सचिन वाझे ख्वाजा युनूस प्रकरणात निलंबित होते, मग फडणवीस म्हणतात त्या प्रमाणे सचिन वाझे यांना सेवेत परत घ्या म्हणून उद्धव ठाकरे मागे लागले होते. हेच वाझे शिवसेनेत होते आणि मुकेश अंबानी आधी उद्धव ठाकरे हे घनिष्ट मित्र आहेत. या प्रकरणाची केंद्राने सखोल चौकशी करायला हवी, कारण जशी चौकशी पुढे जाईल तशा फटक्यांची माळ लागेल आणि अनेक धक्कादायक नावं बाहेर येतील. जगातील सर्वोत्तम पोलीस दल म्हणून मुंबई पोलीस दल ओळखलं जातं. त्या पोलीस दलाला बॉम्बची गाडी एका उद्योगपतीच्या घराबाहेर ठेवायला सांगणं, हे भयंकर आहे. यांची जबाबदारी गृहमंत्र्यांनी घेऊन राजीनामा द्यायला हवा. आणि त्यांची चौकशी व्हायलाच हवी,” अशी मागणी राज यांनी केली.

माझी केंद्राला विनंती आहे की….

“माझी केंद्र सरकारला विनंती आहे की, त्यांनी ह्या प्रकरणाची सखोल चौकशी करायला हवी. कारण या प्रकरणाचा राज्यात निष्पक्ष तपास होईल याची मला अजिबात खात्री नाही. जर केंद्राने पण नीट चौकशी नाही केली, तर मात्र जनतेचा विश्वास कायमचा उडेल. आणि आपण अराजकाच्या दिशेने जाऊ,” असा इशारा राज यांनी दिला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Parambir singh letter to uddhav thackeray raj thackeray asked to thackeray govt over singh transfer bmh
First published on: 21-03-2021 at 11:54 IST