सरकारी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपामध्ये राज्य सरकारी रुग्णालयांतील तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी सहभागी झाले आहेत. त्यामुळे रुग्णालयांतील परिचारिका, क्ष किरण तज्ज्ञ, एमआरआय तज्ज्ञ संपावर गेले आहेत. परिणामी, या विभागात येणाऱ्या रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी निवासी डॉक्टरांसह रुग्णालयातील पॅरामेडिकल अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला असून सीटी स्कॅन, सोनोग्राफी, क्ष – किरण विभागात तातडीची गरज असलेल्या अति महत्त्वाच्या आणि रुग्णालयात दाखल रुग्णांच्या तपासण्या करण्यात येत आहेत.

हेही वाचा >>> संपामुळे मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांवर ताण; बाह्यरुग्ण विभागातील रुग्णसंख्येत २५ टक्क्यांनी वाढ

संपामुळे जे. जे. रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागातील रुग्णसंख्या निम्म्यापेक्षा कमी झाली आहे. त्यामुळे सीटी स्कॅन, क्ष किरण आणि सोनोग्राफीसाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. मात्र रूग्णालयात दाखल असलेल्या आणि अतिदक्षता विभागातून येणाऱ्या रुग्णांच्या तपासण्या करण्यात येत आहेत. सीटी स्कॅन आणि सोनोग्राफी ही डॉक्टरांच्या माध्यमातून केली जात आहे, तर क्ष किरण काढण्यासाठी तंत्रज्ञांची गरज असते. त्यामुळे सीटी स्कॅन व सोनोग्राफी विभागाच्या सेवेवर संपाचा फारसा परिणाम झालेला नाही. मात्र या विभागामध्ये येणाऱ्या रुग्णांची नोंदणी करणे, सोनोग्राफी व सीटी स्कॅन करण्यासाठी आवश्यक साधने उपलब्ध करून देणे ही कामे परिचारिका व तृतीय श्रेणी कर्मचारी करीत असतात.

हेही वाचा >>> रोली काटई टेकडीचा परिसर सुरक्षित होणार ; एमएमआरडीए बांधणार संरक्षक भिंत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संपामुळे या कामावर काहीसा परिणाम झाला असला तरी रुग्णालयातील पॅरामेडिकल अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी ही जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे. क्ष किरण विभाग हा पूर्णतः तंत्रज्ञांवर आधारित असतो. तंत्रज्ञ तृतीय श्रेणी वर्गात येत असल्याने तेही संपात सहभागी झाले आहेत. मात्र क्ष किरण विभागात येणाऱ्या रुग्णांपैकी तातडीची आवश्यकता असलेल्या आणि आंतर रुग्ण विभागातील रुग्णांचे क्ष किरण काढण्याची जबाबदारी निवासी डॉक्टर आणि पॅरामेडिकल अभ्यासक्रमाचे विद्यार्थी पार पाडत असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली.