परळच्या नरे पार्क मैदानात जलसंधारण प्रकल्पाच्या आडून क्रीडा संकुल उभारण्याचा निर्धार करणाऱ्या मनसेच्या विरोधात परिसरातील रहिवाशी एकवटले आहेत. ‘मैदान बचाव समिती’ स्थापन करून रहिवाशांनी स्वाक्षरी मोहीम हाती घेतली आहे. मात्र तरीही या क्रीडा संकुलाचे भूमिपूजन दसऱ्याला करण्याचा मनसेचा निर्धार आहे.
नरे पार्कमधील अभ्यासिका चालविणाऱ्या महापुरुष बालदीप मंडळावर पालिकेने जागा रिकामी करण्याची नोटीस बजावल्यानंतर मनसे येथे क्रीडा संकुल उभारत असल्याचे उघडकीस आले. त्याविरुद्ध शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर आता परिसरातील रहिवाशी मोठय़ा संख्येने एकत्र आले आहेत. कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प होऊ द्यायचा नाही असा निर्धार त्यांनी केला आहे. सध्या मैदान बचाव समितीचे कार्यकर्ते मैदान वाचविण्यासाठी स्वाक्षऱ्या गोळा करीत आहेत. मैदान बचाव समितीचे भास्कर सावंत यांनीही या समितीला पाठिंबा दिला आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळापासून नरे पार्कचे आकारमान ८००० चौरस मीटर असून त्यापैकी सुमारे ११०० चौरस मीटर जागेत अभ्यासिका आणि उद्यान उभारण्यात आले आहे. आता मनसेने तेथे जलतरण तलावासह आणखी काही बांधकाम करण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे एकूण मैदानाचा ४० टक्के भाग व्यापला जाणार आहे. मग मुलांना खेळण्यास जागाच शिल्लक राहणार नाही, असे भास्कर सावंत यांनी सांगितले.
गिरणगावात आता टोलेजंग इमारती उभ्या राहू लागल्या असून कामगार येथून हद्दपार होऊ लागला आहे. आता गिरणगावात श्रीमंतांची संख्या झपाटय़ाने वाढत असून या मैदानात उभारण्यात येत असलेले क्रीडा संकुल त्यांच्यासाठीच उभारण्यात येत आहे का, असा सवाल भास्कर जाधव यांनी केला आहे.