उपनगरीय रेल्वेच्या लाखो प्रवाशांना दिलासा देणाऱ्या बहुप्रतीक्षित परळ टर्मिनसचे काम येत्या मे महिन्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे. यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
परळ टर्मिनसच्या बांधकामासाठी चार कंपन्यांनी रेल्वेला प्रतिसाद दिला असून याबातच्या तांत्रिक बाबी तपासल्या जात आहेत. त्या पूर्ण झाल्यानंतर मे महिन्यात परळ टर्मिनसचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
सध्या मध्य रेल्वेच्या अत्यंत वर्दळीच्या स्थानकांपैकी एक असलेल्या परळ स्थानकात चार फलाट आहेत. त्यामुळे या स्थानकावर अधिक ताण येत असतो. याशिवाय तांत्रिक बिघाड झाल्यास छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या दिशेने जाणाऱ्या व येणाऱ्या लांब पल्ल्यांच्या गाडय़ांना फटका बसतो.
मात्र परळ टर्मिनसच्या कामात या स्थानकाला आणखी दोन फलाट आणि पादचारी पूल उभारण्यात येणार आहेत. यामुळे दादर रेल्वे स्थानकावरील प्रवाशांचा भार हलका करण्यासाठी मदत होणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे मानले जाते.