मुंबई : राज्यातील दहीहंडी उत्सवातील मानवी मनोऱ्यांचा रोमहर्षक थरार अनुभवण्यासाठी मुंबई, ठाणे व महत्त्वाच्या शहरांमध्ये गर्दी उसळणार आहे. या पार्श्वभूमीवर पार्ले स्पोर्ट्स क्लब महिला गोविंदा पथकाने सात थरांचा मानवी मनोरा रचून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. हा इतिहास रचणारे पार्ले स्पोर्ट्स क्लब पहिले महिला गोविंदा पथक ठरले आहे.
पार्ले स्पोर्ट्स क्लब महिला गोविंदा पथकाची २००१ साली स्थापना झाली. या महिला गोविंदा पथकाने ५ थरांचा मानवी मनोरा रचत सुरुवात केली होती. त्यानंतर २००६ साली ६ थर रचण्यात आले आणि २०१३ साली पहिल्यांदा ७ थर रचण्याचा प्रयत्न करण्यात आला, हा प्रयत्न थोडक्यात अयशस्वी ठरला. पण पार्ले स्पोर्ट्स क्लब महिला गोविंदा पथकाने हार मानली नाही. जिद्द, मेहनत व आत्मविश्वासाच्या जोरावर सराव सुरू ठेवला आणि दरवर्षी ७ थर रचण्यासाठी प्रयत्न करीत राहिले. या दृढनिश्चयाच्या जोरावर अखेर १४ ऑगस्ट २०२५ रोजी मध्यरात्री १.१५ च्या सुमारास सरावादरम्यान पार्ले स्पोर्ट्स क्लब महिला गोविंदा पथकाने सात थरांचा मानवी मनोरा रचून यशस्वीरित्या उतरविला आहे. याप्रसंगी सर्व सुरक्षा साधनांचा वापर करण्यात आला. त्यामुळे आता दहीहंडी उत्सवात शनिवार, १६ ऑगस्ट २०२५ रोजी पार्ले स्पोर्ट्स क्लब महिला गोविंदा पथक सर्व सुरक्षा साधनांच्या सहाय्यानेच सात थरांचा मानवी रचण्यासाठी सज्ज झाले आहे.
दरम्यान, विलेपार्ले येथील वामन मंगेश दुभाषी मैदानात पार्ले स्पोर्ट्स क्लब महिला गोविंदा पथकाचा सराव सुरू असतो. यंदा १० जून २०२५ रोजी सरावाला सुरुवात करण्यात आली आणि त्यानंतर दोन महिने दररोज ३ तास सराव करण्यात आला आहे. या गोविंदा पथकात विलेपार्लेसह प्रभादेवी, परळ, धारावी, कुर्ला, विक्रोळी, दिवा, ऐरोली, विरार आदी विविध ठिकाणी राहणाऱ्या महिला सहभागी होतात. या सर्व महिलांच्या सुरक्षिततेची काळजी घेत आणि सर्व सुरक्षा साधनांचा वापर करून सराव करण्यात येतो. तसेच सर्व नियमांचे पालन करण्यात येत असून गोविंदा पथकात अल्पवयीन मुलींचा समावेश नाही.
‘गेल्या अनेक वर्षांपासून पाहिलेले स्वप्न पूर्ण झाले. त्यामुळे सर्व मुलींना प्रचंड आनंद झाला आहे. त्यांच्या मेहनतीचे हे फळ आहे. या प्रवासात मुलींच्या पालकांनी प्रचंड सहकार्य केले असून त्यांचे विशेष आभार. सरावादरम्यान मुलींच्या व्यायामावर आणि आहारावर विशेष लक्ष दिले गेले आहे. शिस्त, सरावातील सातत्य आणि आत्मविश्वासाच्या जोरावर हे यश प्राप्त झाले आहे. आम्हाला आपली परंपरा जपत उत्सव साजरा करायचा आहे. हेच जाणून सर्व सुरक्षा साधनांचा वापर करून सराव करण्यात येतो. या प्रवासात साथ दिलेल्या सर्वांचे आभार’, असे पार्ले स्पोर्ट्स क्लब महिला गोविंदा पथकाच्या प्रशिक्षक गीता झगडे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.