कल्याण पूर्वेतील एका धोकादायक इमारतीच्या पहिल्या माळ्याचा काही भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत एक वृद्ध महिला व एक तरुण जखमी झाला. गुरुवारी सकाळी घडलेल्या या घटनेत वृद्धेच्या खांद्याला गंभीर दुखापत झाली आहे. तिच्यावर पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कोळसेवाडीमधील कर्पेवाडीतील जिमीबाग भागात बोडके नावाची धोकादायक इमारत आहे. या इमारतीत अन्य कुटुंब स्थलांतरित झाली आहेत. फक्त तीन कुटुंब येथे राहतात. त्या पहिल्या माळ्यावर अनुसया पुष्पे (६३) या आजी एकटय़ाच राहतात. गुरुवारी इमारतीचा एक लहान तुकडा त्यांना पडल्याचे दिसले. भीतीने अनुसया यांनी शेजारी राहणाऱ्या बालाजी नाडर (२९) यांना मदतीसाठी बोलावले. त्या वेळी अचानक पहिल्या माळ्याचा आणखी काही भाग कोसळला आणि  अनुसया व बालाजी दोघेही तळ मजल्यावर जाऊन पडले. घटनास्थळी जमलेल्यांनी दोघांनाही तातडीने रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल केले. या अपघातात वृद्ध अनुसया यांचा उजवा खांदा मोडला आहे. नाडर यांना किरकोळ खरचटले आह़े
पालिकेची टंगळमंगळ
पालिकेच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याला याबाबतची माहिती देण्यात आल्यानंतर या उच्चपदस्थाने उगाच या घटनेचा बाऊ करू नका, असा सल्ला कनिष्ठ अधिकाऱ्याला दिला. या इमारतीचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करण्याचे आदेश प्रशासनाने दिले होते. पालिका अधिकाऱ्यांनी यामध्ये टंगळमंगळ केल्याचे सांगण्यात येते.
‘त्यांचे’ फावले
कल्याण पूर्वेतील एका धनवान लोकप्रतिनिधीला या इमारतीच्या जागेवर संकुल उभारायचे आहे, पण वृद्धा घरातून बाहेर निघण्यास तयार नसल्याने या लोकप्रतिनिधीचे नवीन भव्य संकुल उभारण्याचे मनसुबे पूर्ण होत नव्हते. भाग कोसळल्याने या लोकप्रतिनिधीचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होईल, अशी चर्चा कर्पेवाडी भागात आहे.