अर्धवट बांधकामामुळे प्रसृतीगृहाच्या आवारात खड्डे, पाण्याची डबकी आणि शेवाळ
अर्धवट बांधकामामुळे पालिकेच्या मरोळ प्रसूतीगृहाबाहेरील आवारात खड्डय़ांचे साम्राज्य पसरले असून सध्या पावसाळ्यात या खड्डय़ांमध्ये साचलेली पाण्याची डबकी, शेवाळ यांचा सामना करतच गर्भवतींना रुग्णालयाची वाट धरावी लागत आहे.
मरोळमधील प्रसूतीगृहाचे बांधकाम १९८५चे आहे. यानंतर रुग्णालयाचे २०१३-१४मध्ये नूतनीकरण करण्यात आले. मात्र हे बांधकाम अर्धवटच झाले. पालिकेने रुग्णालयाच्या कुंपणाचे आणि आवाराचे काम पूर्ण केलेच नाही. त्यातच रुग्णालयाच्या इमारतीच्या छतालाही गळती लागली आहे. म्हणून ऐन पावसाळ्यात येथे येणाऱ्या गर्भवती महिलांची आणि त्यांच्या नातेवाईकांची प्रसूतीगृहाची वाट बिकट झाली आहे.
जवळपास ३० वर्षे जुन्या असलेल्या या रुग्णालयाच्या आवारातील दगडी लाद्या ठिकठिकाणी उखडल्या आहेत. शिवाय या ठिकाणी पावसाळ्यात पाणी साठते. पाऊस नसेल तेव्हा खड्डय़ांमध्ये पावसाचे पाणी साचून राहते. त्यामुळे, डेंग्यू-मलेरियाची बाधा होण्याची भीतीही आहे. शिवाय पाण्याची डबकी, उरल्यासुरल्या लाद्यांवर जमा होऊन राहिलेले शेवाळे यामुळे रुग्णालयात ये-जा करताना गर्भवतींना तारेवरची कसरतच करावी लागते, अशी तक्रार येथील रहिवासी अजिझ अमरेलीवाला यांनी ‘लोकसत्ता मुंबई’ला केली. रुग्णालयाचे बांधकाम केले त्याचवेळेस आवाराचेही करायला हवे होते. हे असे अर्धवट काम केल्याने महिलांना होणाऱ्या त्रासाबद्दल अमरेलीवाला यांनी पालिका आरोग्य अधिकाऱ्यांना पत्र लिहून प्रसूतीगृहाच्या दुरवस्थेविषयी तक्रार केली आहे.
याबाबत पालिका अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता रुग्णालयाच्या आवाराच्या बांधकामाची योजना असल्याचे सांगण्यात आले. रुग्णालय रस्त्याच्या कडेला आहे. त्यामुळे रुग्णालय परिसरातील जमिनीचे बांधकाम करताना ते रस्त्याच्या उंचीहून थोडे अधिक उंचीचे असेल. त्यामुळे पाणी साचणार नाही. तर पालिकेमार्फत या भागात औषध फवारणी नियमित सुरू आहे, अशी माहिती के-पूर्व विभागाचे पालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. भूपेंद्र पाटील यांनी दिली. मात्र आवाराच्या बांधकामाबाबत संबंधित पालिकेच्या विभागाशी आम्ही संपर्क केला आहे आणि ही बाब विभागाच्या निदर्शनास आणून दिली असल्याचे पाटील यांनी सांगितले. मात्र आवारातील बांधकामाकरिता निविदा आणि अन्य प्रक्रिया पार पडेपर्यंत किमान सहा महिने जाणार आहेत. त्यामुळे या पावसाळ्यात तरी गर्भवतींना समस्यांना तोंड
देतच प्रसूतीगृहाची वाट धरावी लागणार आहे.