रूग्णांना मार्गदर्शन आणि डॉक्टरवरील हल्ले रोखण्यास उपाय

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांअंतर्गत येणाऱ्या रुग्णालयांमध्ये रुग्णांकडून डॉक्टरांवर होणारे हल्ले व त्यामागील कारणांचा शोध घेण्याबरोबरच रुग्ण व नातेवाईकांना उपचारासाठी योग्य मार्गदर्शन करण्यासाठी ‘रुग्णमित्र’ ही नवीन संकल्पना राबविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे रुग्णालयातील अध्यापक डॉक्टरांची रिक्त पदे भरणे व प्रसासकीय कामाला शिस्त लावण्यासाठी राज्याचे माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नियुक्त करण्यात आली आहे.

डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्याची दखल घेऊन रुग्णालयांमध्ये पुरेशी सुरक्षा व्यवस्था देणे, तसेच डॉक्टरांवरील हल्ला हा अजामीनपात्र ठरवणे आदी काही उपाययोजना शासनाने तात्काळ केल्या. मात्र त्यानंतरही डॉक्टरांवरील हल्ले थांबलेले नाहीत. याची दखल घेऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना योग्य प्रकारे मदत मिळावी आणि डॉक्टरांशी योग्य प्रकारे संवाद राहावा यासाठी ‘रुग्णमित्र’ ही संकल्पना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी आरोग्य क्षेत्रातील वेगवेगळ्या तज्ज्ञांशी चर्चा करून डॉक्टरांची व अध्यापकांची रिक्त पदे, प्रशासकीय जबाबदाऱ्या, आर्थिक नियोजन व नियंत्रण आणि रुग्णमित्र संकल्पनेच्या अंमलबजावणीसाठी राज्याचे माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून त्याबाबतचे आदेश गेल्या आठवडय़ात जारी केले आहेत. यातील ‘रुग्णमित्र’ संकल्पनेअंतर्गत रुग्ण व नातेवाईक अपघात विभागात दाखल झाल्यानंतर त्यांना करावयाची मदत, विभागात शस्त्रक्रियेसाठी दाखल झाल्यानंतर लागणारी मदत, चाचण्यांपासून ते रुग्णालयांअंतर्गत रुग्णाला उपचारासाठी लागणाऱ्या आवश्यक बाबींचा तपशील लक्षात घेऊन ‘रुग्णमित्रां’च्या कामाची कार्यप्रणाली निश्चित करण्याचे काम प्रवीण दीक्षित यांची समिती करणार आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये येणाऱ्या रुग्णांची वाढती संख्या व केवळ निवासी डॉक्टरांवरच हल्ले का होतात याचा विचार करून अध्यापकांची रिक्त पदे भरणे आणि गंभीर रुग्ण असलेल्या परिस्थितीत वरिष्ठ डॉक्टरांनी रुग्णाच्या नातेवाईकाशी करावयाचा संवाद याचीही जबाबदारी निश्चित केली जाणार आहे.  वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांना याबाबत विचारले असता डॉक्टर व रुग्ण यात सुसंवाद असावा, तसेच रुग्णांना प्रभावी उपचार मिळून डॉक्टरांवर हल्लेच होऊ नयेत यासाठी प्रवीण दीक्षित यांची समिती नेमण्यात आली आहे. वैद्यकीय महाविद्यालयांचे बळकटीकरण करताना अध्यापकांची रिक्त पदे, तसेच त्यांच्या पदोन्नतीचे प्रश्नही कायमचे मार्गी लागावे ही भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.  वैद्यकीय महाविद्यालयात संशोधनालाही मोठय़ा प्रमाणात चालना देण्यात येणार असल्याचे महाजन म्हणाले.