वाहतूक पोलीस विलास शिंदे यांच्या मृत्यूनंतर वाहतूक पोलिसांप्रमाणेच प्रादेशिक परिवहन विभागानेही वाहन चालकांवरील कारवाईचा वेढा भक्कम केला आहे. केंद्र सरकारच्या निर्देशांप्रमाणे १८ वर्षांखालील मुले गाडी चालवताना आढळल्यास त्यांच्या पालकांवर आणि गाडीच्या मालकावर कारवाई करण्यात येणार आहे. अशा प्रकरणांमध्ये एक हजार रुपये दंड किंवा तुरुंगवास अशी शिक्षा ठोठावण्यात येणार असून ही कारवाई सुरू करण्याचे आदेश परिवहन विभागाने सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांना दिले आहेत.
मुंबईसह राज्यभरात १८ वर्षांखालील मुले विनापरवाना वाहने चालवत असल्याची संख्या वाढल्याचे गेल्या काही वर्षांमधील आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. २०१२मध्ये मुंबईत पाच हजारांहून अधिक वाहनचालक १८ वर्षांखालील आणि विनापरवाना गाडी चालवताना पकडले गेले होते. २०१५मध्ये आठ हजारांहून अधिक जणांना या प्रकरणी अटक झाली होती. ही संख्या २०१६मध्ये जुलैअखेपर्यंतच सहा हजारांपेक्षा जास्त आढळली आहे. मोटार वाहन कायद्यानुसार ५० सीसी क्षमतेपेक्षा जास्त इंजिन असलेल्या वाहनांचा परवाना १८ वर्षांखालील मुलांना दिला जात नाही. तसेच सार्वजनिक वाहन चालवण्यासाठी वयाची २० वर्षे पूर्ण केली असणे आवश्यक असते. या नियमाचे उल्लंघन सातत्याने होत आहे. त्यातच वाहतूक शाखेतील पोलीस विलास शिंदे यांनी वांद्रे येथे एका अल्पवयीन मुलाला विनाहेल्मेट व विनापरवाना गाडी चालवताना पकडले. त्या वेळी या मुलाच्या भावाने शिंदे यांना केलेल्या मारहाणीत लक्षात आल्यानंतर वाहतूक पोलिसांनी १८ वर्षांखालील चालकांवर कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. आता परिवहन विभागाने केंद्र सरकारच्या निर्देशांनुसार कारवाई सुरू करण्याचे आदेश राज्यभरातील प्रादेशिक परिवहन कार्यालयांना दिले आहेत.