मुंबई : ‘वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालया’मध्ये तब्बल पंधरा वर्षांनी वाघाच्या बछडय़ांचा जन्म झाला असून नवजात मादी पिल्लाचे नामकरण ‘वीरा’ असे करण्यात आले आहे, तर पाच महिन्यांपूर्वी जन्मलेल्या पेंग्विनच्या पिल्लाचे नाव ‘ऑस्कर’ असे ठेवण्यात आले आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांच्या उपस्थितीत मंगळवारी हा ‘बारसे सोहळा’ पार पडला.

जिजामाता उद्यानात कित्येक वर्षे वाघ नव्हते. औरंगाबादच्या ‘सिद्धार्थ गार्डन प्राणिसंग्रहालया’तून १२ डिसेंबर २०२० रोजी वाघाची जोडी राणीच्या बागेत आणण्यात आली होती. त्यापैकी  वाघाचे नाव शक्ती, तर वाघिणीचे करिश्मा असे ठेवण्यात आले होते. या जोडीने गेल्या वर्षी १४ नोव्हेंबर रोजी एका मादी बछडय़ाला जन्म दिला. या बछडय़ाचे नामकरण मंगळवारी ‘वीरा’ असे करण्यात आले. 

प्राणिसंग्रहालयातील आकर्षण केंद्र असलेल्या पेंग्विन कक्षातील मोल्ट-फ्लिपर या जोडीने १८ ऑगस्ट २०२१ रोजी एका नर पिल्लाला जन्म दिला. त्याचे नामकरणही मंगळवारी पार पडले. त्याला ‘ऑस्कर’ हे नाव देण्यात आले आहे.  नामकरणाचा कार्यक्रम अगदी समारंभपूर्वक आणि प्रसारमाध्यमांच्या उपस्थितीत पार पडला. प्राणिसंग्रहालयातील पशुवैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांनी सुचवलेल्या नावांमधून ही दोन नावे निवडण्यात आली आहेत.

वीराला आईकडून प्रशिक्षण

करिश्मा वाघीण ही सध्या आपल्या बछडय़ाच्या संगोपनात गुंतली आहे. तसेच शक्ती अधूनमधून आपल्या बछडय़ाला पाहण्यासाठी येतो. वीराला पशुवैद्यकांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले असून लवकरच लसीकरण केले जाणार आहे. सहा महिन्यांनंतर पर्यटकांना तिला पाहता येणार आहे. करिश्मा वाघिणीला खायला मांस दिले की ते कसे खायचे याचे धडे वीरा आपल्या आईकडून घेते आहे.

अनेक वर्षांनी वाघाचा जन्म

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राणीच्या बागेत पंधरा वर्षांपूर्वी एक वाघाची जोडी होती. मात्र त्यांनी कधी पिल्लांना जन्म दिला नाही. वाघाच्या जोडय़ा खूप आक्रमक असतात. त्यांचे एकमेकांशी नाही पटले तर ते एकमेकांवर हल्लाही करतात. त्यामुळे शक्ती व करिश्मा ही जोडी आल्यानंतर आम्ही ही जोडी एकमेकांना पूरक आहे की नाही याचे बरेच निरीक्षण केले. या जोडीने पिल्लाला जन्म दिला असून राणीच्या बागेतील हे अनेक वर्षांनंतर झालेले वाघाचे बाळंतपण असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.