वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात उद्या दाखल होणार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भायखळ्याच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात (राणीची बाग) कायमचा मुक्काम ठोकण्यासाठी येणारा पहिला विदेशी पाहुणा हम्बोल्ट पेंग्विन सोमवारी संध्याकाळी दक्षिण कोरियातील सेऊल येथून मुंबईला प्रयाण करणार असून, मंगळवारी पहाटेच्या सुमारास राणीच्या बागेत दाखल होणार आहे. मात्र, मुंबईकरांना ‘पेंग्विन’ दर्शनासाठी डिसेंबपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. फेब्रुवारी २०१७ मध्ये होणाऱ्या पालिका निवडणुकीत पेंग्विन दर्शन ‘करून दाखविले’ची टिमकी वाजविता यावी याची सत्ताधारी शिवसेनेने काळजी घेतल्याने मुंबईकरांचे पेंग्विन दर्शन लांबणीवर पडले आहे.

राणीच्या बागेच्या नूतनीकरणाचे काम सध्या युद्धपातळीवर करण्यात येत आहे. नूतनीकरणानंतर विदेशी प्राण्यांचे दर्शन मुंबईकरांना घडविण्याचा पालिकेने संकल्प सोडला आहे. त्याचाच एक भाग असलेले हम्बोल्ट पेंग्विन मंगळवारी पहाटे मुंबईत दाखल होत आहेत. पाच माद्या आणि तीन नर असे आठ होम्बोल्ड पेंग्विन सोमवारी सायंकाळच्या सुमारास एका विशेष विमानातून सेऊल येथून मुंबईकडे रवाना होणार आहेत. त्यांच्यासोबत त्यांची देखभाल करण्यासाठी एक तज्ज्ञ व्यक्तीही मुंबईत येत आहे. हम्बोल्ट पेंग्विनना घेऊन येणारे विमान सोमवारी मध्यरात्री १च्या सुमारास मुंबई विमानतळावर पोहोचणार असून सर्व कायदेशीर सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर मंगळवारी पहाटेच्या सुमारास ते राणीच्या बागेत दाखल होतील.

चिली आणि पेरू देशांदरम्यान समुद्रामधील हम्बोल्ट शीत प्रवाहाच्या ठिकाणी हे पेंग्विन आढळतात. म्हणून करडय़ा आणि काळ्या रंगाचे हे पेंग्विन ‘हम्बोल्ट पेंग्विन’ या नावाने ओळखले जातात. राणीच्या बागेतील प्राण्यांच्या रुग्णालयाच्या आवारात एका बाजूला सर्व आधुनिक सुविधांनी युक्त पिंजरा तयार करण्यात आला असून या पिंजऱ्यामध्ये पेंग्विनना ठेवण्यात येणार आहे. त्यांच्यासाठी ४ ते २५ डिग्री सेल्सिअस तापमानाची आवश्यकता असून त्यांच्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या पाणवठय़ासाठी वर्षांला ८० हजार ते एक लाख लिटर पाण्याची आवश्यकता भासणार आहे. पाणवठय़ामधील पाणी पुनर्प्रक्रिया करून वापरण्यात येणार असून पाणवठय़ातील पाणी सतत प्रवाही ठेवावे लागणार आहे. त्याचबरोबर त्यांच्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या पिंजऱ्यांमध्ये कायम थंड वातावरण राहावे यासाठी वातानुकूलित यंत्रणाही बसविण्यात आली आहे.

राणीच्या बागेत उभारलेल्या पिंजऱ्यातील वातावरणाशी हम्बोल्ट पेंग्विनने जुळवून घेतल्यानंतर त्यांचे दर्शन मुंबईकरांना होणार आहे. त्यासाठी फार तर एक महिन्याचा कालावधी पुरेसा होता. मात्र फेब्रुवारी २०१७ मध्ये होणाऱ्या पालिका निवडणुकीच्या प्रचारात पेग्विन दर्शन ‘करून दाखविल्या’चे श्रेय मिळविण्यासाठी शिवसेना मुंबईकरांना प्रतीक्षा घडवत असल्याची चर्चा मुंबईकरांमध्ये सुरू आहे.

  • पालिकेने लाखो रुपये खर्च करून प्राण्यांच्या रुग्णालयाच्या आवारात हम्बोल्ट पेंग्विनसाठी पिंजरा उभा केला असला तरी तो तात्पुरता आहे.
  • राणीच्या बागेतील रोपवाटिकेच्या जवळ एक दुमजली इमारत उभारण्यात आली असून या इमारतीच्या एका भागात हम्बोल्ट पेंग्विनसाठी कायमस्वरूपी पिंजरा उभारण्याचे काम सध्या सुरू आहे. हे काम डिसेंबपर्यंत पूर्ण होईल आणि त्यानंतर हम्बोल्ट पेंग्विनना तेथे हलविण्यात येणार आहे.
  • गेल्या पाच वर्षांत पूर्ण झालेल्या पालिकेच्या प्रकल्पांची ‘करून दाखविले’ची यादी तयार करण्यात आली आहे. या यादीमध्ये हम्बोल्ट पेंग्विनचाही समावेश आहे.
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Penguin coming in rani baug till december
First published on: 25-07-2016 at 02:23 IST