scorecardresearch

बनावट ओळखपत्रावर लोकल प्रवास करणाऱ्यांना पश्चिम रेल्वेने ठणकावलं, म्हणाले…

करोनाच्या पार्श्वभूमीवर लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी बंद ठेवण्यात आली आहे

Mumbai Local
मुंबईत अनेकजण बनावट ओळखपत्राच्या आधारे लोकलमधून प्रवास करताना सापडले आहेत. (संग्रहित छायाचित्र)

मुंबईतली लोकल सेवा सध्या फक्त अत्यावश्यक सेवेतल्या कर्मचाऱ्यांसाठी सुरु आहे. मात्र, काही नागरिक अत्यावश्यक सेवांच्या बनावट ओळखपत्राच्या आधारे लोकलमधून प्रवास करत असल्याचं समोर आलं आहे. यावरुनच पश्चिम रेल्वेने अशा नागरिकांना ठणकावलं आहे. आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरुन त्यांनी ट्विट केलं आहे.

या ट्विटमध्ये पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे की, बनावट ओळखपत्राच्या आधारे प्रवास करणे हा दंडनीय अपराध आहे. त्याचबरोबर पश्चिम रेल्वेने नागरिकांना असं आवाहनही केलं आहे की, सध्या सुरु असलेल्या विशेष लोकल गाड्यांमधून केवळ महाराष्ट्र सरकारने ठरवून दिलेल्या अत्यावश्यक सेवा देणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनीच प्रवास करावा.


करोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली आहे. दुकाने, खासगी कार्यालयं तसंच इतर सुविधा खुल्या झाल्या असल्या तरी लोकल सेवा मात्र सर्वसामान्य नागरिकांसाठी अद्याप बंद आहे. ही सेवा सध्या केवळ अत्यावश्यक सेवेतल्या कर्मचाऱ्यांसाठीच आहे. मात्र, अत्यावश्यक सेवेचं बनावट ओळखपत्र बनवून लोकलने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढल्याचं या काळात दिसून आलं आहे.

एका वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार, मध्य रेल्वेतही बनावट ओळखपत्राच्या आधारे किंवा तिकीटाशिवाय प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे. गेल्या ४५-४६ दिवसात २,७२५ लोक बनावट ओळखपत्र वापरुन प्रवास करताना आढळले आहेत. आत्तापर्यंत रेल्वे प्रशासनाने १३ लाख ६५ हजार रुपयांचा दंड बनावट ओळखपत्र वापरणाऱ्यांकडून वसूल केला आहे.

पश्चिम रेल्वेतही अनेक नागरिक अशा प्रकारे प्रवास करताना पकडले गेले आहेत. कुर्ला, मानखुर्द, मीरारोड, वसई, मुंब्रा, उल्हासनगर आणि मुंबईच्या काही भागांमध्ये ५०० रुपयांत अशा प्रकारची बनावट ओळखपत्र बनवून दिली जातात, असं कळत आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-06-2021 at 10:08 IST