मुंबई : मध्य रेल्वेच्या सॅण्डहर्स्ट रोडमधील एका शेडमध्ये गेल्या तीन वर्षांपासून पडून असलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा दर्शनी भागात उभा करण्याची मागणी पुन्हा एकदा लोकप्रतिनिधींनी केली आहे. तसेच हा पुतळा साकारण्याचे काम अगदी अंतिम टप्प्यात असताना ते थांबवण्याची सूचना देण्यामागे रेल्वेने कोणतेही कारण दिले नाही, असे सांगून जे. जे कला महाविद्यालयातील प्राध्यापकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. रेल्वे प्रशासन मात्र सूचना नसल्याचे सांगून गप्प बसले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे शिवरायांचा २० ते २५ फूट अश्वारूढ पुतळा उभा करण्याचा निर्णय घेतल्यानंतर कोटय़वधी रुपये खर्चून साकरण्यात आलेला पुतळा तीन वर्षांहून अधिक काळ रेल्वेच्या डेपोत अडगळीत ठेवण्यात आला आहे. याबाबत ‘लोकसत्ता’ने गुरुवारी वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा लोकप्रतिनिधींनी हा पुतळा स्थानकाच्या दर्शनी भागात उभा करावा अशी मागणी केली.   या पुतळय़ाचे काम करणाऱ्या जे.जे महाविद्यालयाने अंतिम टप्प्यातील काम पूर्ण करण्यासाठी मध्य रेल्वेला वारंवार पत्रेही पाठवली आहेत. मात्र त्याला उत्तरच आले नसल्याचे कळते. 

मागणीकडे वारंवार दुर्लक्ष..

शिवरायांचा पुतळा उभारणीबाबत रेल्वे बोर्ड आणि मध्य रेल्वेकडे वारंवार मागणी करण्यात आली. परंतु त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप, शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी केला आहे. हा पुतळा सीएसएमटीच्या दर्शनी भागात (मुंबई महानगरपालिका समोर) उभारण्याची पुन्हा एकदा मागणी करणार असल्याचे ते म्हणाले. 

फायबरचे काम पूर्ण केल्यानंतर त्यावर धातूचा मुलामा चढवण्याचा अंतिम टप्पा होता. त्यासाठी सात ते आठ महिने लागले असते, त्यापूर्वी काम थांबविण्याची सूचना मध्य रेल्वेने दिली. मात्र, काम थांबविण्यामागील नेमके कारण मात्र त्यांनी स्पष्ट केले नाही.

– प्रा. विश्वनाथ साबळे, अधिष्ठाता, जे.जे.स्कूल ऑफ आर्ट्स

येत्या १७ ऑगस्टला दिल्लीहून खासदारांची एक समिती मुंबईतील स्थानक पाहणी दौऱ्यावर येणार आहे. या समितीत मी आहे. समितीच्या भेटीवेळी हा पुतळा उभा करण्याबाबत पुन्हा मागणी करेन. याविषयी यापूर्वी आंदोलन करण्यात आले होते. गरज पडल्यास पुन्हा आंदोलन करू.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

– अरविंद सावंत, शिवसेना खासदार