मुंबई : क्रूझवरील अमली पदार्थ पार्टीप्रकरणी केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभाग (एनसीबी) आणि विभागाचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्याकडून केल्या जात असलेल्या तपासाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना कोणतेही वक्तव्य करण्यापासून मज्जाव करण्याची जनहित याचिकेद्वारे मागणी करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाने मात्र बुधवारी या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला.
मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठापुढे बुधवारी ही याचिका सादर करण्यात आली. त्या वेळी न्यायालयाने याचिकेवरील सुनावणीसाठी दिवाळीची सुट्टी संपेपर्यंत वाट पाहा वा सुट्टीकालीन न्यायालयासमोर ती सादर करा, अशी सूचना याचिकाकर्त्यांना केली. मौलाना कौसर अली यांनी ही याचिका केली आहे. दरम्यान मलिक यांनी खोटे आरोप केल्याचा दावा करत भाजपच्या मोहित भारतीय यांनी मलिक यांच्याविरोधात महानगर दंडाधिकाऱ्यांसमोर बदनामीप्रकरणी फौजदारी तक्रार दाखल केली आहे.