केंद्र सरकारपाठोपाठ राज्य सरकारनेही पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी करत सामान्यांना आणखी दिलासा देण्याचा प्रयत्न केला. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भातील घोषणा केली. त्यामुळे आता राज्यभरात पेट्रोलचे दर लिटरमागे दोन रुपयांनी तर डिझेलचे दर एका रुपयाने कमी होतील. त्यामुळे वाहनधारकांना दिलासा मिळेल. केंद्र सरकारने राज्यांना पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी करण्याचे आदेश दिल्यानंतर महाराष्ट्राकडून हे पाऊल उचलण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इतर महानगरांच्या तुलनेत मुंबईत पेट्रोलचे दर चढे राहण्याची शक्यता आहे. पेट्रोलवर राज्य सरकार मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यात २५ टक्के तर राज्यात इतर ठिकाणी २६ टक्के व्हॅट लावते. त्याशिवाय लिटरमागे ११ रुपयांचा अधिभार आकारला जातो. डिझेलवर राज्य सरकार मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यात २१ टक्के तर राज्यात इतर ठिकाणी २२ टक्के व्हॅट लावते. त्याशिवाय लिटरमागे दोन रुपयांचा अधिभार आकारला जातो. पेट्रोल-डिझेलवरील व्हॅटमधून सरकारला १९ हजार कोटींपेक्षा जास्त महसूल मिळतो. मात्र, आता व्हॅट कमी केल्याने सरकारला २८०० कोटी रूपयांचे नुकसान सहन करावे लागणार आहे.

भारतात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चा तेलाच्या किंमती घसरल्या आहेत. २०१४ च्या सुरुवातीला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाचे दर प्रति बॅरल १०० डॉलरपेक्षा जास्त होते. त्यावेळी देशात पेट्रोलचे दर ८० रुपये प्रतिलिटरपर्यंत पोहोचले होते. सध्या कच्चा तेलाच्या किंमती त्यातुलनेत कमी होऊनदेखील पेट्रोल ८० रुपये प्रतिलिटर या दरानेच मिळत आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या करामुळे पेट्रोल- डिझेलचे दर कमी होत नव्हते. यामुळे केंद्र सरकारवर चहुबाजूंनी टीका सुरू होती. विरोधकांनी यावरून केंद्र सरकारला धारेवर धरले होते. जनतेच्या या असंतोषाची दखल घेत केंद्र सरकारने गेल्या मंगळवारीच पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी कर कमी केले होते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Petrol and diesel price cut down in maharashtra and mumbai
First published on: 09-10-2017 at 18:37 IST