मुंबई : महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दृकश्राव्य माध्यमातून संवाद साधणार आहेत. स्वातंत्र्याच्या  अमृतमहोत्सवी वर्षां निमित्ताने केंद्र सरकारने हा कार्यक्रम आखला असून त्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश राज्य सरकारने पालिकेच्या विभाग कार्यालयाला दिले आहेत.

महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर देशभरातून लाखो आंबेडकरी अनुयायी अभिवादन करण्यासाठी येतात. त्यांची थांबण्याची सोय दादर शिवाजी पार्क येथे केली जाते. गेल्या वर्षी करोनामुळे महापरिनिर्वाण दिनावरही र्निबधांचे सावट होते. मात्र यंदा  र्निबध नसल्याने दरवर्षी प्रमाणेच मोठय़ा संख्येने अनुयायी अभिवादनासाठी येण्याची शक्यता आहे. यंदाचे वर्ष हे स्वातंत्र्य दिनाचे अमृत महोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जमलेल्या अनुयायांशी संवाद साधणार आहेत. त्याकरता शिवाजी पार्क येथे नियोजन केले जाणार आहे. हे नियोजन कसे असावे याबाबत केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागाने राज्य सरकारला कळवले आहे. राज्याने पालिकेच्या विभाग कार्यालयाला त्याबाबत कळवले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. महाराष्ट्रात नागपूर, पुणे, रत्नागिरी, मुंबई अशा चार ठिकाणी महापरिनिर्वाण दिन आणि अमृत महोत्सव असा एकत्रित कार्यक्रम होणार आहे.