केंद्रातील काँग्रेस सरकार आपल्याला त्रास देत असताना शरद पवार यांनी मदत केली होती याची आवर्जुन आठवण सांगत त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पवार यांचे बारामतीमध्ये अभिनंदनही केले. या मदतीची मोदी नक्कीच परतफेड करतील, असे बोलले जाऊ लागले आहे. ‘भानगडबाज’ राष्ट्रवादीचे नेते अडचणीत सापडू नयेत, हा पवार यांचा प्रयत्न यशस्वी होतो का याची राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.
‘व्हॅलेंटिन दिनी’ मोदी आणि पवार यांनी परस्परांचे गुणगान गात उभयतांचे संबंध चांगले असल्याचे सूचित केले. केंद्रातील सत्तेत असणाऱ्या पक्षांबरोबर पवार राहतात, असा अनुभव आहे. आता भाजप सत्तेत असल्याने राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने मोदी यांच्याशी जुळवून घेतले आहे. यूपीए सरकारच्या काळात पवार यांची आपल्याला मदत झाली व महिन्यातून तीन-चार वेळा तरी आपले पवारांशी बोलणे होते, असे सांगत मोदी यांनी राष्ट्रवादीची काहीशी अडचण केली. कारण आपण भाजपपासून अंतर ठेवून आहोत हे भासविण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीचे नेते करतात. मोदी यांनी मात्र आपण पवारांचा सल्ला घेतो किंवा त्यांची मदत झाली होती हे सांगत राष्ट्रवादीबद्दल संभ्रमाचे वातावरण तयार केले.
मोदी यांनी पवार यांचे कौतुक केले म्हणजे राजकीय जवळीक नाही, असा दावा राष्ट्रवादीच्या गोटातून केला जातो. पण मोदी यांच्या वक्तव्याने भाजप आणि राष्ट्रवादी हे अधिक जवळ असल्याचा संदेश जनमानसात गेला आहे. जनमानसात तयार होणारे मत बदलणे राष्ट्रवादीला सोपे जाणार नाही. मोदी यांनी कौतुक केल्याने राष्ट्रवादी लगेचच भाजपच्या बरोबर जाणार नाही, पण या दोन पक्षांमध्ये जवळीक आहे हा संदेश पुरेसा आहे. पवारांवरील मोदी स्तुतीसुमनाने काँग्रेसच्या गोटात समाधानाचीच बाब आहे. कारण विरोधी पक्षाची पोकळी भरून काढण्याकरिता दोन्ही काँग्रेसमध्ये स्पर्धा असताना आता राष्ट्रवादीला घेरण्यासाठी काँग्रेसकडून कायम मोदी यांच्या वक्तव्याचा आधार घेतला जाईल.
अजित पवार, छगन भुजबळ, सुनील तटकरे या राष्ट्रवादीच्या नेत्यांची चौकशी भाजप सरकारने सुरू केली असली तरी पवारांनी मोदी यांना अडचणीच्या काळात मदत केली होती. आता मोदी पवार यांच्या मनाप्रमाणे मदत करतील, असे काँग्रेसचे नेते बोलू लागले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवसेनेला सूचक इशारा
मोदी यांनी शरद पवार यांचे कौतुक करीत मित्र पक्ष शिवसेनेला सूचक इशारा दिला आहे. गेले काही दिवस शिवसेनेने भाजप सरकारच्या विरोधात भूमिका घेतली आहे. मग कधी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तर कधी अन्य मंत्री सरकारला लक्ष्य करीत आहेत. शिवसेनेने दबावाचे राजकारण केले तरी दबणार नाही, कारण उद्या शिवसेना सरकारमधून बाहेर पडल्यास राष्ट्रवादीचा पर्याय उपलब्ध असल्याचा संदेश मोदी यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेला दिला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi showers praise on sharad pawar in baramati
First published on: 15-02-2015 at 03:16 IST