लाखोंच्या ठेवी अडकल्या
पंजाब आणि महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेवर (पीएमसी) रिझव्र्ह बँकेने घातलेल्या र्निबधांचा फटका शहरातील अनेक गृहनिर्माण संस्थांना बसला आहे. शहरातील अनेक गृहनिर्माण संस्थांचे खाते या बँकेत असल्यामुळे लाखो रुपये अडकले आहेत. बँकेच्या आर्थिक व्यवहारांवर र्निबध आल्यानंतर गृहनिर्माण संस्थेचा दररोजचा खर्च तसेच इतर मोठय़ा देखभाल-दुरुस्तीसाठी निधी जमवायचे संकटच उभे राहीले आहे.
प्रतीक्षानगर गोल्डन आर्केड को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचे खाते २००८ पासून पीएमसी बँकेत असून, ५२ लाख रुपये मुदतठेवीच्या स्वरूपात असल्याचे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. त्याचबरोबर सुमारे पाच लाखांची रक्कम बचत खात्यात आहे. या गृहनिर्माण संस्थेचे खाते फक्त पीएमसी बँकेतच आहे. ‘आम्ही काही दिवसांपूर्वीच गृहनिर्माण संस्थेच्या बैठकीत लिफ्ट दुरुस्ती आणि इमारतीच्या रंगकामाचा निर्णय घेतला होता. त्यासाठी अंदाजे ४० लाख खर्च येणार होता. तसेच दर महिन्याला रखवालदार, सफाई कर्मचारी यांचा पगार आणि डागडुजीची इतर कामे असा सुमारे ४० ते ५० हजार रुपये खर्च येतो. बँकेवरील र्निबधामुळे आता ते काम तर रखडणारच, पण कर्मचाऱ्यांचे पगार कसे द्यायचे हा प्रश्न आ वासून उभा आहे. बँकेबाबत असे काही घडेल हे स्वप्नातही वाटले नव्हते. मात्र बुधवारच्या घटनेमुळे धक्का बसला आहे,’ असे गोल्डन को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे सचिव लक्ष्मणसिंग राठोड यांनी सांगितले.
सायन परिसिरातील सायन-प्रतीक्षानगर को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशनच्या अंतर्गत ३६ गृहनिर्माण संस्था आहेत. या फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यापैकी सिंधुदुर्ग, पारिजात अशा १४ गृहनिर्माण संस्थांचे खाते हे पीएमसी बँकेत आहे. ‘या १४ गृहनिर्माण संस्थांपैकी अनेकांचे खाते हे केवळ याच एक बँकेत आहे.
तोडगा काढण्याची विनंती करणार
आम्ही रिझव्र्ह बँक आणि संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देऊन यावर तोडगा काढण्याची विनंती करणार आहोत,’ असे सायन-प्रतीक्षानगर को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष अंकुश सारंग यांनी सांगितले.