कुल्र्यातील पानवाल्याकडून ६०० जणांना कार्डवाटप; किंमत २०० ते ३००
पासपोर्टपासून ते शिष्यवृत्तीपर्यंतच्या राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांकरिता अधिकृत पुरावा म्हणून ग्राह्य धरल्या जाणाऱ्या आधारकार्डाच्या ‘टपऱ्या’ आता गल्लीबोळात निघू लागल्या असून याठिकाणी कोणतेही कागदपत्र नसतानाही २०० रुपयांपासून पाच हजार रुपयांच्या मोबदल्यात आधार कार्ड बनवून दिले जात आहे. चेंबूरमध्ये अशाच एका टोळीला पोलिसांनी जेरबंद केले असून या संपूर्ण रॅकेटचा सूत्रधार कुर्ला नेहरूनगर येथील एक पानवाला असल्याची माहिती समोर आली आहे. या पानवाल्याने तब्बल सहाशे जणांना कोणत्याही कागदपत्राशिवाय आधार कार्ड मिळवून दिल्याचे उघड झाले असून या सर्वाची नावे व पत्तेही पोलिसांच्या हाती लागले आहेत.
चेंबूर पोलिस ठाण्याचे दहशतवाद विरोधी कक्षाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक काळंगे आणि त्यांच्या पथकातील कर्मचारी २६ जुलै रोजी चेंबूरच्या स्वस्तिक पार्क येथील एका मोबाइल दुकानातून विकण्यात आलेल्या सिमकार्डाची माहिती घेण्यासाठी गेले होते. यावेळी कागदपत्रांच्या पडताळणीदरम्यान दोन व्यक्तिंची कागदपत्रे संशयास्पद आढळली. यापैकी बाबू शब्बीरअली सलमानी (२३) या सलूनमध्ये काम करणाऱ्याच्या आधारकार्डवर त्या सलुनचाच पत्ता असल्याचे आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी अधिक सखोल चौकशी केली असता, बाबूने नेहरुनगरच्या एस. जी. बर्वे मार्गावरील पंडित नावाच्या एका पानवाल्याकडून हे आधारकार्ड बनवून घेतल्याचे उघड झाले. सलून मालकाच्या पत्नीच्या नावे असलेले वीजबिल आणि दोन फोटो तसेच तीनशे रुपये देऊन बाबूने ते आधारकार्ड बनवून घेतले होते.
ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी पंडित उर्फ रामआश्रय यादव (४४) याला ताब्यात घेतले. नेहरुनगरच्या कामगार नगर महापालिका शाळेत असलेल्या आधारकार्ड कॅम्पमधून हे कार्ड मिळविल्याचे पंडितने पोलिसांना सांगितले. दुकानाची झडती घेतली असता, पंडितकडे एक नोंदवही सापडली. त्यात अनेक इसमांची नावे, संपर्क क्रमांक, त्यांच्याकडून स्वीकारलेली रक्कम व त्यांचे करायचे काम याविषयी सविस्तर नोंद आढळली. तसेच अनेक रेशनकार्डच्या झेरॉक्स प्रती, पॅनकार्ड आणि आधारकार्डचे अर्ज, १६ पॅनकार्ड सापडले.
तिघांना अटक
पंडित याने अनेकांची रेशनकार्ड मिळवून त्याच्या झेरॉक्स काढून त्यावर आधारकार्ड हव्या असलेल्या व्यक्तींची नावे झेरॉक्सवर लिहून त्याची पुन्हा झेरॉक्स काढून त्याआधारे आधारकार्ड मिळवल्याचे स्पष्ट झाले. नेहरुनगरमधील आकाशदीपक सोसायीटीतील आधारकार्ड एजन्सीचे कार्यालयातील दिनेश साळुंखे (२५वर्षे) याला बनावट कागदपत्रे देऊन १०० रुपयांच्या बदल्यात आधारकार्ड काढून देत असल्याचे स्पष्ट झाले. पंडितला २७ तर साळुंखे याला २८ जुलैला अटक करण्यात आले. पंडितला रेशनकार्डवर नावे वाढविण्यासाठी लिहिण्याची मदत करणारा तसेच रेशनिंग अधिकाऱ्याची बनावट स्वाक्षरी करणाऱ्या शांताराम चव्हाण (३८) यालाही ३१ जुलैला अटक करण्यात आली. या व्यक्तींनी किती जणांना बनावट कागदपत्रांच्या आधारे आधारकार्ड-पॅनकार्ड बनवून दिले याची माहिती घेत असल्याचे परिमंडळ सहाचे पोलीस उपायुक्त शहाजी उमाप यांनी स्पष्ट केले.