रिमोट कंट्रोलमार्फत मानवविरहित ‘ड्रोन’द्वारे पुरविलेला पिझ्झा संबंधित विक्रेत्याला चांगलाच महागात पडण्याची चिन्हे आहेत. या प्रकरणाची मुंबई पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून संबंधित विक्रेत्याकडून स्पष्टीकरण मागविले आहे. याशिवाय यापुढे असा प्रयोग करण्यापूर्वी पोलिसांना कळविणे बंधनकारक केले आहे. या प्रकरणी संबंधित विक्रेत्यावर काही कारवाई करता येईल का, याची चाचपणी पोलिसांकडून केली जात आहे.
परदेशात विशेषत: अमेरिकेत प्रचलित असलेली ही पद्धत लोअर परळ येथील फ्रान्सिस्को पिझ्झा विक्रेत्याने बुधवारी प्रत्यक्षात अमलात आणून वरळी येथील एका टॉवरमध्ये पिझ्झा पुरवण्याचा प्रयोग केला. या प्रकारामुळे जागे झालेल्या पोलिसांनी या विक्रेत्याकडे स्पष्टीकरण मागविले आहे. हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाची यासाठी परवानगी घेतली होती का, याची विचारणा पिझ्झा विक्रेत्याकडे करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला पत्र लिहून अशी परवानगी संबंधित विक्रेत्याने घेतली होती का वा परवानगी न घेता असा प्रयोग करता येतो का, याची माहितीही मागविण्यात आल्याचे अतिरिक्त आयुक्त मधुकर पांडे यांनी स्पष्ट केले.रिमोट कंट्रोलद्वारे मानवविरहित ड्रोन आकाशात सोडताना हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. यापुढे अशी परवानगी घेताना मुंबई पोलिसांना कळविण्याचे बंधन घालण्यात येणार आहे. तसे पत्र आम्ही हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला लिहिणार असल्याचेही एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

आसनगाव स्थानकात ‘रेल रोको’
मुंबई : आसनगाव स्थानकात गुरुवारी सकाळी तिकीट खिडकी तासभर बंद पडल्याने प्रवाशांच्या सहनशक्तीचा अंत झाला आणि त्यांनी स्थानकात ‘रेल्वे थांबवा’ आंदोलन केले. चौकशीअंती तिकीट खिडकी बंद होण्यामागे तांत्रिककारण असल्याचे स्पष्ट झाले. अखेर तासाभरानंतर तिकीट खिडकी सुरू झाली. मात्र या गोंधळात दोन गाडय़ा रद्द करण्यात आल्या. पंधरा-वीस मिनिटे उलटूनही तिकीट खिडक्या न उघडल्याने खिडक्यांसमोरील प्रवाशांच्या रांगा वाढल्या. त्यामुळेचिडलेल्या प्रवाशांनी आंदोलनाचा मार्ग पत्करला.हा गोंधळ तब्बल पाऊण तास चालू होता. अखेर सकाळी १०.५०च्या सुमारास हा बिघाड दुरुस्त करून खिडक्यांवरून तिकीटविक्री सुरू झाली. या प्रकरणी रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना धमकावणाऱ्या पाच प्रवाशांना अटक करण्यात आली.