बांगलादेशी नागरिकांवर कारवाई करताना पोलिस हतबल ठरत असल्याचे चित्र विधानपरिषदेत गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्या निवेदनावरून दिसून आले. पोलिसांनी गेल्या चार वर्षांत ७६९८ बांगलादेशींना हुडकून काढले असून ३००९ जणांची भारताबाहेर पाठवणी झाली आहे. तर ७ पाकिस्तानी नागरिकांना अटक केली असून सहाजणांना भारताबाहेर हद्दपार केल्याची माहिती त्यांनी दिली.
मुंबईसह राज्यात लाखो बांगलादेशी असून त्यांनी येथील नागरिकत्वाचे पुरावे मिळविले आहेत, असे मुद्दे अलका देसाई, संजय दत्त, किरण पावस्कर यांच्यासह काही सदस्यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे मांडले होते. पण बंगाली येत असलेले हे नागरिक पश्चिम बंगालमध्ये येतात. पॅन कार्ड, वाहन परवाना मिळवितात, मतदार यादीत नाव आणतात. त्यांची ठेवण भारतीयांप्रमाणेच असल्याने त्यांना शोधणे आणि पुरावे तपासणे पोलिसांना कठीण जाते. त्यांना येथील नागरिकत्वाचे पुरावे देण्यात सरकारी कर्मचारीही सामील होतात. न्यायालयात त्यांना हजर करून बांगलादेशी ठरविण्याची प्रक्रियाही किचकट असल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले.