स्थानिक पोलिसांच्या डोळ्यांसमोर सुरू असलेल्या जुगाराच्या अड्डय़ावर दुसऱ्या हद्दीतील गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून तब्बल ८१ आरोपींना अटक केली आहे. करी रोड येथील ना. म. जोशी मार्गावरील जनता जिमखाना येथे हा छापा टाकण्यात आला असून जुगार खेळण्यासाठी वापरली जाणारी नाणी आणि रोख रक्कम असा एकूण १८ लाख ८३ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने अड्डय़ाच्या व्यवस्थापकाला अटक केली असून मालक मात्र फरार झाला आहे.
करी रोड स्थानकाजवळ डिलाईल रोडवर जनता जिमखाना असून येथे जुगार बिनदिक्कतपणे सुरू असतो. गुन्हे शाखेच्या कक्ष ५ ला या जिमखान्यात दिवसाला चालत असलेल्या लाखो रुपयांच्या उलाढालीविषयी माहिती मिळाली. पथकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक अजय सावंत यांच्या नेतृत्वात मंगळवारी साडेआठ वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकला. यात रमी खेळणारे ५२ खेळाडू, २० जॉकी आणि ९ अन्य जणांना ताब्यात घेऊन ना. म. जोशी मार्ग पोलिसांच्या ताब्यात दिले.