मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी पक्ष कार्यालयांमध्ये प्रचाराच्या तयारीची जोरदार लगबग सुरू आहे. मात्र, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील गटतट- फुटीमुळे निवडणुकीच्या रिंगणात कुणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडणार हे अद्याप निश्चित नसले तरी फुटीचे राजकारण प्रचार साहित्य निर्मात्यांच्या पथ्यावर पडले आहे. प्रचार साहित्याच्या मागणीत वाढ झाली आहे.

लोकसभा, विधानसभा तसेच महानगरपालिकांच्या निवडणुकींच्या काळात मुंबईतील लालबाग – परळ भागांतील विविध दुकानांमध्ये प्रचार साहित्याची मोठ्या प्रमाणात विक्री होते. सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लालबाग – परळमधील दुकानांमध्ये भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार व अजित पवार गट), शिवसेना (ठाकरे गट व शिंदे गट), महाराष्ट्र नवनिर्माण सेना, आरपीआय, बहुजन समाज पक्ष, समाजवादी पक्ष, एमआयएम आदी विविध पक्षांचे प्रचार साहित्य उपलब्ध आहे. त्यामध्ये राजकीय पक्षांचे नाव व निवडणूक चिन्हाचा समावेश असलेले छोटे व मोठे झेंडे, खिशाला लावण्याचा बिल्ला, गाडीला लावायचे स्टीकर, गळ्यातील शेला (साधा किंवा कॉटन स्वरूपात), टोपी, कपड्यांचे फलक, हातातील धागा, कीचेन, लांब कापडी पट्टी आदी विविध स्वरूपातील प्रचार साहित्य उपलब्ध आहे.

हेही वाचा – पंचतारांकित इमारतीमधील घरांसाठी ऑगस्टमध्ये सोडत, गोरेगावमध्ये मध्यम आणि उच्च गटासाठी म्हाडाची ३३२ घरे

उमेदवारी जाहीर झालेले, मिळण्याची खात्री असलेल्या उमेदवारांनी हळहळू प्रचार सुरू केला आहे. त्यामुळे आता साहित्याची मागणीही वाढू लागली आहे. सर्व राजकीय पक्षांचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर आणि उमेदवारी अर्ज भरल्यानंतर तसेच प्रत्यक्षात जाहीर सभा, चौक सभा, मिरवणुका, दुचाकी फेरी सुरू झाल्यानंतर प्रचार साहित्याची विक्री दुपटीने वाढण्याची शक्यता विक्रेते व्यक्त करीत आहेत. पक्षातील फाटाफुटीमुळे अनेक गटतट निर्माण झाल्यामुळे साहित्याची मागणीही वाढत आहे. पूर्वी एखाद्या पक्षाने किमान प्रमाणात साहित्याची मागणी नोंदवत होते. आता दोन्ही गटांकडून मागणी वाढली आहे.

मागणी तेवढीच निर्मिती

साहित्याची मागणी वाढत आहे. मात्र, त्याचवेळी कोणत्या गटाकडून किंवा पक्षाकडून किती मागणी नोंदवली जाईल, याची खात्री नसल्यामुळे सध्या मागणी तेवढीच निर्मिती असे धोरण व्यावसायिकांनी ठेवले आहे. ‘राजकीय पक्षांमध्ये फूट पडण्यापूर्वी आमच्याकडे प्रचार साहित्याचा साठा तयार असायचा. तसेच संबंधित मुख्य राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून प्रचार साहित्याला मागणीही बऱ्यापैकी चांगली होती. परंतु आता दोन पक्षांमध्ये फूट पडल्यामुळे नव्याने प्रचार साहित्य तयार करावे लागत आहे. प्रचार साहित्य तयार करूनही एका पक्षाचे दोन गट झाल्यामुळे कोणत्या गटाचे बहुसंख्य कार्यकर्ते प्रचार साहित्य घेण्यासाठी येतील, या गोष्टीचा काही अंदाज नाही. त्यामुळे आता जशी मागणी आहे, त्याप्रमाणे प्रचार साहित्य तयार करून देत आहोत’, असे मुंबईतील लालबागमधील श्री राम ड्रेसवाला या दुकानातील प्रचार साहित्याचे घाऊक विक्रेते हेमंत पाटील यांनी सांगितले. तर नॅशनल ड्रेसवाला दुकानातील प्रचार साहित्याचे घाऊक विक्रेते सुनील मोरे म्हणाले की, ‘आम्ही मागणीनुसार प्रचार साहित्याची निर्मिती करीत आहोत. कारण तयार केलेले प्रचार साहित्य निवडणुकांनंतर फुकट जाते. निवडणुकांनंतर प्रचार साहित्याला मागणी खूपच कमी असते. आता हळूहळू राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून प्रचार साहित्याची मागणी होऊ लागली आहे’.

हेही वाचा – सीएसएमटी स्थानकात प्रवाशांचे हाल, अपुऱ्या स्वच्छतागृहांमुळे पुरुष महिलांची कुचंबणा

प्रचार साहित्याचे दर किती?

प्रचार साहित्य – दर

एक शेला – ४ रुपयांपासून १० रुपयांपर्यंत

झेंडा – ५ रुपयांपासून १०० रुपयांपर्यंत

बिल्ला – २ रुपयांपासून ५० रुपयांपर्यंत

टोपी – ५ रुपयांपासून २५ रुपयांपर्यंत