करोनामुळे सणासुदीच्या काळात गर्दीवर नियंत्रण आणण्याच्या सूचना केंद्र सरकारने दिल्या असल्या तरी दहीहंडी साजरी करण्याबाबत भाजप आणि मनसेने आक्रमक पवित्रा घेत दहीहंडी उत्सव साजरा केला. मनसेने आक्रमक भूमिका घेत दहीहंडी उत्सव साजरा केला. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना कोणतीही गोष्ट होऊ नये म्हणून पहिली, दुसरी तिसरी लाट मुद्दाम आणली जात आहे असे म्हटले होते. त्यावर आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भाष्य करत अप्रत्यक्षरित्या सल्ला दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“सर्व जगामध्ये आपण जी परिस्थिती पाहत आहेत. तज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे तिसरी लाट येणार आहे. जर तिसरी लाट आली तर त्याचा मोठ्या प्रमाणावर परिणाम होईल. राजकीय पक्षांना आणि नेत्यांना विनंती आहे की त्यांनी लोकांच्या जिवापेक्षा आपला अजेंडा मोठा मानू नका आणि त्याच्यामध्ये सर्वांनी सहकार्य करा,” असे दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले आहे.

जनतेला घाबरवण्यासाठी करोनाची लाट आणली जात आहे; राज ठाकरेंचा गंभीर आरोप

काय म्हणाले होते राज ठाकरे?

“गेल्या वेळच्या आणि आताच्या परिस्थितीमध्ये खूप फरक आहे. लॉकडाऊन आवडे सरकारला अशी परिस्थिती झाली आहे. कोणतीही गोष्ट होऊ नये म्हणून पहिली, दुसरी तिसरी लाट मुद्दाम आणली जात आहे. यांच्या हाणामाऱ्या सुरु आहेत. भास्कर जाधवांच्या मुलाने मंदिरात अभिषेक केला. यांच्यासाठी मंदिरे उघडी आहेत बाकीच्यांनी मंदिरात जायचं नाही. यांनी वाटेल त्या गोष्टी करायच्या आम्ही दहीहांडी साजरी करायची नाही. माननीय बाळासाहेबांच्या नावाने हडप केलेल्या महापौर बंगल्यावरती बिल्डरांच्या गाड्या येणं काही कमी झालेल्या दिसत नाहीत. सरकारकडून कामे करुन घेण्यासाठी येणाऱ्यांच्या गाड्या कमी झालेल्या दिसत नाहीत. कुठेच काही कमी झालेलं नाही तर या सणांवरच तुम्ही कसे काय येता? त्यामुळे मी माझ्या महाराष्ट्र सैनिकांना जोरात दहीहंडी उत्सव साजरा करा जे होईल ते होईल असं सांगितलं होतं,” असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

करोनामुळे दहीहंडी साजरी न करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं होतं. निर्बंधांचा निषेध म्हणून ठाण्यासह, मुंबईत अनेक ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे दहीहंडी उभारली होती. यावेळी कार्यकर्त्यांनी पोलिसांचे नियम धुडकावून दहीहंडी फोडत मनसेचा झेंडा फडकवला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Political leaders not consider their agenda bigger than people dilip walse patil raj thackeray abn
First published on: 01-09-2021 at 13:40 IST