देवनार कचराभूमीवरील आगीमुळे बहुतांश उपनगरे
धुराच्या विळख्यात; प्रदूषणात शुक्रवारी दिल्लीशीही बरोबरी
हवामान खात्याच्या अंदाजानुसार शुक्रवारी मुंबईचे आकाश निरभ्र असले तरी जमिनीलगतच्या वातावरणात सकाळपासून धुराचे ढग होते. हा धूर होता देवनार कचराभूमीत लागलेल्या आगीचा. या धुरामुळे मुंबई-नवी मुंबईची हवा काळवंडून गेली असून प्रदूषणाच्या बाबतीत शुक्रवारी आर्थिक राजधानीने दिल्लीशी बरोबरी केली. मालाड येथे सूक्ष्म धूलिकणांची संख्या सुरक्षित पातळीपेक्षा चौपटीने वाढली होती. बहुतांश उपनगरांत हीच स्थिती होती. शुद्ध हवेची खात्री देणारा कुलाबा परिसरही प्रदूषणाच्या विळख्यात होता.
घसरलेले तापमान व समुद्रावरून येणारे बाष्प यामुळे हिवाळ्यात काही वेळा मुंबईत धुके पसरते. गुरुवारी सकाळी असे धुके होते. मात्र गुरुवार संध्याकाळपासून धुक्याची जागा धुराच्या जाड पडद्याने घेतली. या धुराचे निर्मिती केंद्र म्हणून देवनार कचराभूमीवरील आगीकडे बोट दाखवले जात आहे. तेथील धुराचे लोट सर्व उपनगरांत पोहोचले आणि इतर वेळी सकाळी तुलनेने स्वच्छ असलेली मुंबईची हवा काळवंडली. याचा सर्वाधिक फटका मालाड व चेंबूर परिसराला बसून दोन्ही ठिकाणी सूक्ष्म कणांची पातळी वाढली.
बोरिवली, अंधेरी, भांडुप, वांद्रे-कुर्ला संकुल, नवी मुंबईतही प्रदूषक घटकांची पातळी तिपटीने वाढली. कुलाब्यातही अतिसूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण तिपटीहून अधिक झाले होते. शुक्रवारी संध्याकाळी प्रदूषणाच्या पातळीत वाढच झाली होती. वाऱ्याचा वेग व दिशा तसेच देवनार कचराभूमीची स्थिती पाहता शनिवारीही परिस्थितीत बदल होण्याची शक्यता नाही. दिल्लीतही प्रदूषणाची गंभीर स्थिती असून त्यावर मात करण्यासाठी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला सूचना दिल्या आहेत. मुंबईतील प्रदूषण रोखण्याबाबत मात्र पालिका तसेच राज्य सरकारकडून पाऊल उचलण्यात आलेले नाही.
मुंबई, नवी मुंबईतील १० उपनगरांत ओझोन, नायट्रोजन डायऑक्साइड, कार्बन मोनॉक्साइड तसेच २.५ मायक्रोमीटरपेक्षा कमी व २.५ ते १० मायक्रोमीटर व्यासाच्या सूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण मोजले जाते. यातील सर्वाधिक प्रदूषक घटकावरून त्या दिवसाची प्रदूषण पातळी ठरते. यातील बहुतांश घटक हे वाहनांमधून बाहेर पडणारा धूर, कारखान्यातील धुरांडी तसेच बांधकामांमुळे हवेत मिसळणाऱ्या धूलिकणांमुळे वाढतात. मुंबईतील प्रदूषणात २.५ मायक्रोमीटरहून कमी व्यासाच्या धूलिकणांचे प्राबल्य आहे.

Untitled-1