सृष्टिज्ञान

मराठीत विज्ञान लेखन करणे अवघड. अशातही सृष्टिज्ञान या विज्ञानविषयक मासिकाचा दिवाळी अंक विविध विज्ञान विषयांनी परिपूर्ण तर आहेच पण अनेक प्रश्नांवर वाचकांचे कुतूहल शमवणारा आहे. ‘विश्वाचं रहाटगाडगं’ हा डॉ. बाळ फोंडके यांचा लेख विशेष लक्षणीय. त्यात सध्या अमेरिकेत असलेल्या डॉ. अभय अष्टेकरांच्या संशोधनाआधारे विश्वाची नवीन माहिती दिली आहे. आपल्या शरीरात असलेल्या जीवाणूंची महती डॉ. राजेंद्र देवपूरकर यांच्या लेखात अधोरेखित झाली आहे. समुद्रातील प्रवाळांपासून, काजव्यांचा दीपोत्सवापर्यंत अनेक गोष्टींवरील माहितीपूर्ण लेख यात आहेत. रोजच्या मधाची वैशिष्टय़ सांगणारा वेगळा लेख आहे. हवामानतज्ज्ञ डॉ. रामानन यांच्यावरील व्यक्तीपर लेखही तितकाच रंजक. हॅले धूमकेतूच्या दर्शनानंतर केशवसुतांना स्फुरलेली कविता ही या अंकाची इतर वैशिष्टय़े आहेत.

  • संपादकराजीव विळेकर, किंमत १०० रुपये

 

आश्लेषा

प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक सत्यजीत राय यांनी विपुल लेखनही केले आहे. राय यांच्या ‘डॉ. शेरिंगची स्मरणशक्ती’ या विज्ञानकथेचा अनुवाद विलास गीते यांनी केला आहे. व्यक्तिचित्रं या विभागातील शिक्षण क्षेत्रात कार्यरत इरगोंडा पाटील आणि हेरंब कुलकर्णी यांच्यावरील लेख वाचनीय आहेत. ज्येष्ठ संशोधक आणि इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचे कुलगुरू डॉक्टर गणपती यादव यांचा प्रवास शिल्पा सुर्वे यांनी रेखाटला आहे. लैंगिकता, स्त्रीपुरुष तसेच ट्रान्स या संदर्भात ‘बॉल्स ऑर नो बॉल्स’ अशा बोल्ड शीर्षकाचा लेख संजीव खांडेकर लिखित लेख आवर्जून वाचावा असा आहे. मधुमेहापासून मुक्ती यावर डॉ. श्रीकांत जोशी यांनी लिहिले आहे.

  • संपादक : अशोक तावडे आणि सुनील कर्णिक किंमत : १५० रुपये

 

शब्ददर्वळ

‘शब्ददर्वळ’चा यंदाचा दिवाळी अंक विविध विषयांना वाहून घेण्यात आला आहे. यातील ओम नमो जी आद्या! हे संपादकीय विशेष वाचनीय आहे. या अंकाची सुरुवात मंगेश पाडगावर यांच्यासह सुलभा देशपांडे आणि डॉ. अरुण टिकेकर यांना मानवंदना देऊन करण्यात आली आहे. वैश्विक भारतीय संस्कृतीच्या पाऊलखुणा यावर डॉ. बाबासाहेब तराणेकर यांनी लिहिलेल्या लेखातून भारतीय संस्कृतीचा इतिहास समजण्यास मदत होते.

सरप्राईज ही सुप्रिया पटवर्धन यांनी लिहलेली कथा मनाला भावून जाते. तसेच पंढरीनाथ रेडकर यांनी लिहिलेली कथाही वाचनीय आहे. भावस्पंदनेमधील कविता दर्जेदार असल्याने अंक वाचनीय झाला आहे.

  • संपादकरीकृष्ण बेडेकर किंमत : १५० रुपये

 

आहुति

सुवर्ण महोत्सवी वर्ष असलेल्या साप्ताहिक ‘आहुति’चा यंदाचा दिवाळी अंक कृषी विषयाला वाहिलेला आहे. नैसर्गिक पद्धतीने शेती करणारे राजू भट संपादित या अंकात पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञान याचा मेळ साधून कृषीक्षेत्रात होत असलेल्या विविध प्रयोगांची दखल घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. शाश्वत शेती, जलसंधारण, सेंद्रिय शेती, कृषीपर्यटन आदी अनेक विषयांवरील लेखांचा त्यात समावेश आहे. वाढते शहरीकरण आणि औद्योगिकीकरणाच्या रेटय़ात मूलभूत गरज असणारा शेती व्यवसाय टिकण्यासाठी केल्या जात असलेल्या प्रयत्नांची यथायोग्य दखल या अंकात घेतली गेली आहे.

  • संपादकगिरीश त्रिवेदी. किंमत१५० रुपये

 

चंद्रकांत

चार ते पाच कादंबऱ्या हे चंद्रकांत दिवाळी अंकाचे वैशिष्टय़ यंदाही कायम राहिले आहे. प्रा. डॉ. अरुण हेबळेकर, डॉ. श्रीकृष्ण जोशी, प्रा. पु. रा. रामदासी, अरुण नेरुरकर यांच्या चार संपूर्ण कादंबऱ्या आणि राजेंद्र चौधरी यांच्या लेखणीतून साकारलेली दीर्घकथा नेहमीप्रमाणेच वाचकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरल्या आहेत. जोसेफ तुस्कानो, शैलेंद्र शिर्के आणि  अनंत मनोहर यांच्या पानपूरक चौकटीही वाचनीय आहेत. किरण हणमशेट यांचे मुखपृष्ठ गूढ कादंबऱ्यांना वाहिलेल्या दिवाळी अंकाला साजेसे आहे.

  • संपादिका : नीलिमा कुलकर्णी किंमत : २०० रुपये

 

अंतर्नाद

अंतर्नादचा दिवाळी अंक लिली जोशी यांची ‘नातं’, मेघश्री दळवी यांची ‘एई आकाशे’ आणि प्रणव सखदेव यांची ‘मूल’प्रश्न कथांनी नटलेला आहे. सुहास बहुळकर यांच्या चित्रकार गोपाळ देऊसकर-कलावंत आणि माणूस, आयुष्याची मौल्यवान माती- शिल्पकार करमकर, बॉम्बे स्कूल.. आठवणीतले, अनुभवलेले या पुस्तकांचा परिचय अवधूत परळकर यांनी करून दिला आहे. डॉ. आनंदीबाई जोशी यांच्यावरील लघुपटाचा प्रवास कथन केला आहे अंजली कीर्तने यांनी ‘एका लघुपटाची स्थित्यंतरं’ या लेखात.  तसेच नरेंद्र चपळगावकर, विजय पाडाळकर, विनय हर्डीकर, सुरेश द्वादशीवार यांचे लेखनही वाचनआनंद देऊन जाते.

  • कार्यकारी संपादकवर्षां काळे; किंमत२०० रुपये.

 

गंधाली

गंधालीचा यंदाचा अंक हा नेहमीप्रमाणेच सर्वोत्तम साहित्याने नटलेला आहे.  विशेष वाचनीय मजकुरात कै. उमाकांत कीर यांच्या सहवासातले आणि अखेरच्या काळातील क्षणांची आठवण त्यांच्या पत्नी गिरीजा कीर यांनी रेखाटली आहे. ती  वाचताना त्या दोघांचे भावबंध, एकमेकांना कायम साथसोबत देणारे प्रसंग वाचकांना हेलावून टाकतात. अरुण डावखरे यांनी अनुवादित केलेली कथाही वाचाकांना प्रेमात पाडते. मनोज आचार्य यांचा लेख आणि डॉ. रमाकांत देशपांडे, वर्षां रेगे, श्रीधर दीक्षित, प्रतिभा सराफ, अरुण सावळेकर यांच्यासहित अनेक कथाकारांच्या कथांनी या अंकातील साहित्याचा दर्जा उंचावला आहे. डॉ.  अशोक कोळी यांची कादंबरीही वेधक आहे.

  • संपादक : डॉ. मधुकर वर्तक; किंमत : १८० रुपये