मुंबईतील दैनंदिन रुग्णसंख्या कमी होत आहे. त्यामुळे मुंबईतील निर्बंध काही प्रमाणात शिथिल करावेत, अशी मागणी होत आहे. तसेच लसीचे दोन डोस घेतलेल्यांना रेल्वे प्रवास करु देण्याच्या मागणीने जोर धरला आहे. या पार्श्वभूमीवर लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना प्रवास करण्यासंबंधी पालकमंत्री अस्लम शेख यांनी मोठं विधान केलं आहे. करोनामुळे मुंबईत अजूनही काही प्रमाणात निर्बंध कायम आहेत.

“चार महिन्यांपूर्वी लागू केलेल्या निर्बंध हळूहळू कमी करण्यात येत आहेत. आमच्या मंत्र्यांनाही वाटत आहे की ज्या लोकांनी लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत त्यांना प्रवास करण्याची परवानगी देण्यात यावी. रेस्टॉरंटचे तासही वाढवावेत. त्यावर आजच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत चर्चा होणार आहे. लोकल प्रवास, दुकानांची वेळ या सर्वांवर चर्चा करण्यात येईल,” असे अस्लम शेख यांनी म्हटलं आहे.

करोनाची दुसरी लाट ओसरत असून, दिवसेंदिवस रुग्णसंख्येतही घट होताना दिसत आहे. त्यामुळे हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत असून, नागरिक कामानिमित्ताने घराबाहेर पडू लागले आहेत. असं असलं तरी देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत नागरिकांना प्रवास करताना मोठी कसरत करावी लागत आहे. करोनाचे निर्बंध लागू करताना राज्य सरकारने सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवासावर बंदी घातली. ही बंदी अद्याप उठवण्यात आलेली नसून, लोकांकडून बंदी हटवण्याची मागणी होत आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुंबईतील लोकल सेवा बंद असल्याने मुंबईकरांचे हाल होत असल्याने त्याकडे राज ठाकरे यांनी राज्य सरकारचं लक्ष वेधलं होतं. राज यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं होतं. त्यात लोकलमधून प्रवास करण्यासंदर्भातील निर्णय तातडीने घेण्याचा सल्ला राज यांनी दिला होता.