मुंबई : कर्नाटकमधील परिवहन सेवा उत्तम असून कर्नाटक राज्य मार्ग परिवहन सेवेतर्फे चालवण्यात येणाऱ्या ‘गरुडा’, ‘ऐरावत’, ‘अंबारी’ आदी लांबपल्ल्याच्या सेवा प्रवासीभिमुख ठरल्या आहेत. त्यामुळे कर्नाटक परिवहन विभागाचा अभ्यास करण्यासाठी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक कर्नाटकात दौऱ्यावर गेले आहेत. लवकरच कर्नाटक परिवहन विभागाचा पॅटर्न महाराष्ट्रात राबविण्यात येण्याची शक्यता आहे.

इतर राज्यातील चांगल्या गोष्टींना भेट देऊन त्या आपल्या राज्यात कशा अमलात आणता येतील याचा अभ्यास करावा. जेणेकरून विविध ठिकाणच्या नाविन्यपूर्ण योजना आपल्या राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध होतील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व लोकप्रतिनिधींना मार्गदर्शन करताना सांगितले होते. याचाच एक भाग म्हणून प्रताप सरनाईक १ फेब्रुवारी रोजी कर्नाटकच्या दौऱ्यावर गेले आहेत. या दोन दिवसीय दौऱ्यात ते कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस सेवेची माहिती घेत आहेत. त्यांच्यासोबत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, नितीन मैद (महाव्यवस्थापक वाहतूक) व नंदकुमार कोलारकर (महाव्यवस्थापक यंत्र) हे अधिकारी आहेत.

या दौऱ्यादरम्यान कर्नाटक राज्याचे परिवहन मंत्री रामलिंगा रेड्डी यांच्यासोबतही सरनाईक यांची बैठक होणार असून दोन्ही राज्यांच्या परिवहन सेवेसंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच कर्नाटकमधील प्रादेशिक परिवहन व्यवस्थापनाचा अभ्यास करणे, त्याबरोबर कर्मचाऱ्यांसाठी राबवण्यात येत असलेल्या प्रोत्साहन योजना जाणून घेण्यासाठी या दौऱ्याची आखणी करण्यात आली असून इतर राज्यातील परिवहन सेवांचा अभ्यास करून त्यांच्या चांगल्या कल्पना राज्याच्या एसटी महामंडळामध्ये राबवणे शक्य आहे का, याचीही चाचपणी या दौऱ्याच्या निमित्ताने केली जाणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कर्नाटकमधील परिवहन सेवा उत्तम असल्याने तेथे प्रत्यक्षात जाऊन अधिक माहिती घेण्यात येत आहे. महाराष्ट्रातील एसटी प्रवाशांना अधिकाधिक चांगली सुविधा पुरवण्यात येण्यासाठी हा अभ्यास दौरा आहे. – प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री