चार दिवसांच्या पावसाने मालाडमधील रस्त्याची चाळण

मुंबईकरांना दरवर्षी भेडसावणारी खड्डय़ांची भीती यंदाही खरी ठरू लागली असून गेल्या चार दिवसांच्या पावसात पश्चिम उपनगरांतील महत्त्वाच्या आणि वर्दळीच्या मालाड लिंक रोडची अक्षरश: चाळण झाली आहे. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून त्यातून वाहने हाकताना वाहनचालकांना भारीच कसरत करावी लागत आहे. त्यामुळे पावसाळय़ात मुंबईकरांचा रस्ते प्रवास खड्डेविरहित असेल, हा पालिकेचा दावा यंदाही फोल ठरला आहे.

मालाड लिंक रोड येथील इन ऑरबिट मॉलजवळ गोरेगावच्या दिशेने जाणाऱ्या सिग्नल, मालाड मीठ चौकी जंक्शन आदी ठिकाठी खड्डे पडल्याचे दिसून आले येत आहे. आधीच लिंक रोडवर मेट्रोचे काम सुरू असल्यामुळे मधला अर्धा रस्ता कामाने व्यापला गेला आहे. मालाड लिंक रोड परिसरात अनेक मॉल, खासगी कंपनीची कार्यालये आहेत. त्यात मेट्रोची कामे सुरू असतानाही रस्त्याच्या दुतर्फा उभी असलेली वाहने हटविण्यात आलेली नाहीत. त्यामुळे चिंचोळ्या झालेल्या लिंक रोडवरील खड्डय़ांमुळे उपनगरवासीय हैराण झाले आहेत. कामाच्या दिवशीच नव्हे तर एरवी शनिवारी-रविवारी अशा सुट्टीच्या दिवशीही हा रस्ता वाहतूक कोंडीने ग्रस्त असतो. त्यात या ठिकाणी मोठेमोठे खड्डे पडल्याने आणि त्यात पावसाचे पाणी साचून राहिल्याने वाहनचालकांची त्रेधातिरपिट उडत आहे.

वर्दळीच्या रस्त्यावर ज्या ज्या ठिकाणी खूप खड्डे आहेत, त्यांची तात्पुरती डागडुजी करू नका. त्याऐवजी रस्त्याच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंतचे काम करण्यात यावे, असे आदेश पालिकेने दिले होते. तरीही मालाड लिंक रोजवरील काही खड्डय़ांमध्ये पेव्हर ब्लॉक बसवून वेळ मारून नेण्यात आली आहे. मेट्रोचे काम सुरू असल्यामुळे अर्धा रस्ता त्या कामामुळे व्यापला आहे. त्यामुळे वाहनचालकांकरिता चांगला, डांबरीकरण केलेला रस्ताचा उपलब्ध नाही. त्याऐवजी वाहनचालकांना रस्त्याच्या बाजूच्या खडबडीत पेव्हर ब्लॉकच्या रस्त्याचा आधार घ्यावा लागतो. रस्ता अरुंद झाल्यामुळे मालाड लिंक रोड येथील गोरेगाव स्पोर्टस क्लब, मीठ चौकी या ठिकाणी दिवसाही मोठय़ा प्रमाणात वाहतूककोंडीला वाहनचालकांना सामोरे जावे लागते आहे. विशेषत: सिग्नल सुरू झाल्यावर दुचाकीस्वार वेगाने गाडी हाकतात आणि खड्डय़ांचा अंदाज न आल्यामुळे अपघात घडतात, अशी माहिती येथील स्थानिक दुकानदारांनी दिली.

दरम्यान, यासंदर्भात पालिकेच्या ‘पी उत्तर’च्या सहाय्यक आयुक्त संगीता हसनाळे यांच्याकडे विचारणा केली असता, लिंक रोडवर खड्डे असल्यास त्याची पाहणी करून ते बुजवण्यात येतील, असे उत्तर त्यांनी दिले.