मुंबई आणि उपनगर तसेच नवी मुंबई या ठिकाणी वीज पुरवठा खंडीत झाला होता. युद्धपातळीवर तीन साडेतीन तासातच बहुतांश वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. वीज पुरवठा खंडित झालेल्या घटनेची सर्वंकष चौकशी करण्याचे तसेच यापुढे याची पुनरावृत्ती होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या अनुषंगाने घेतलेल्या बैठकीत दिले. या बैठकीत उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी वस्तुस्थिती सादर केली त्याचप्रमाणे रुग्णालये आणि रेल्वेचा वीजपुरवठा प्राधान्याने सुरळीत करण्यात आला अशी माहिती उर्जा विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई महानगर क्षेत्रातील वीज खंडित प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज वर्षा येथे बैठक घेतली. या बैठकीस ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. बैठकीस मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे तसेच बेस्ट,  टाटा,  अदानी या कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.  हा बिघाड अनपेक्षित होता की अपेक्षित होता किंवा यात काही गाफिलपणा झाला आहे का हे तपासण्याचे निर्देश देताना मुख्यमंत्र्यांनी ज्या कारणांमुळे ही घटना घडली त्या वाहिन्यांची दुरुस्ती युद्धपातळीवर करण्यास सांगितले. येणाऱ्या चार दिवसात मुसळधार परतीचा पावसाचा अंदाज असून यादृष्टीनेही वीजेच्या मागणीचा विचार करुन सतर्क राहण्याचे निर्देश त्यांनी दिले.

मुंबईमध्ये आज सकाळी सव्वा दहाच्या सुमारास अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला. पॉवर ग्रीड फेल्युअरमुळे एकाच वेळी मुंबईतील अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाल्याचे वृत्त आहे. बेस्टने यासंदर्भातील माहिती ट्विटरवरुन दिली असून टाटाकडून येणाऱ्या विद्युत पुरवठ्यात बिघाड झाल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाल्याचे बेस्टने म्हटलं. मुंबईमध्ये वीजपुरवठा करणाऱ्या महावितरण, अदानी, बेस्ट, टाटा अशा सर्वच वीज वितरकांच्या सेवेला या ग्रीड फेल्युअरचा फटका बसला. आता या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Power cut case to be fully investigated says cm uddhav thackeray scj
First published on: 12-10-2020 at 20:00 IST