मुंबई : वाढलेला उकाडा आणि विजेच्या प्रचंड वाढत्या मागणीमुळे मुंबईत बेस्टकडून केल्या जाणाऱ्या विद्युतपुरवठय़ातही काही तांत्रिक बिघाड होत आहेत. विद्युतपुरवठय़ात झालेल्या बिघाडामुळे बुधवारी सकाळी आणि सायंकाळी मुंबादेवी तसेच प्रभादेवी परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. बेस्ट उपक्रमाने दिलेल्या माहितीनुसार, बेस्टकडून केल्या जाणाऱ्या ११ किलोवॉटच्या विद्युतपुरवठय़ात सकाळी सातच्या सुमारास तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे मुंबादेवीसह अन्य परिसरातील वीज गायब झाली. वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी अर्धा तास लागला. यानंतर सायंकाळी सहाच्या सुमारास प्रभादेवीतील महत्त्वाच्या ११ किलोवॉटच्या फिडरमध्येही तांत्रिक बिघाड झाला.  हा मोठा बिघाड असल्याने बेस्टच्या विद्युत कर्मचाऱ्यांनी त्वरित  धाव घेत त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले. त्यामुळे पुरवठा करणाऱ्या सबस्टेशनमध्येही तांत्रिक समस्या उद्भवली. 

प्रभादेवी, दादरचा काही परिसर व अन्य भागांत जवळपास एक तास वीजपुरवठा खंडित झाला होता. ऐन उकाडय़ात वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांची गैरसोय झाली. सातच्या सुमारास वीजपुरवठा सुरळीत झाला आणि नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. त्यानंतर भायखळा व अन्य परिसरातही वीज गेली होती. विजेच्या मागणीत वाढ झाल्याने वीजपुरवठय़ावरही अधिक भार येत असल्याचे बेस्ट उपक्रमाकडून स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे ट्रान्सफॉर्मर, केबल तसेच सबस्टेशन यांसह अन्य बिघाड होत असल्याचेही सांगण्यात आले.