“महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पोलीस उपनिरीक्षक पदाची, नगरपरिषदेची आणि महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेची (महाज्योती) परीक्षा २९ ऑक्टोबर रोजी एकाच दिवशी होणार आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी या परीक्षा देण्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे,” असं म्हणत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपा यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, “विद्यार्थ्यांच्या आशा-आकांक्षांशी खेळणे आणि त्यांना एका चांगल्या भविष्यापासून वंचित ठेवणे हा भाजपा सरकारचा नवा छंद असल्याचे दिसते. या शिवाय दुसरे काय कारण असू शकेल? एकाच दिवशी होणाऱ्या ३ महत्त्वाच्या स्पर्धा परीक्षांमुळे विद्यार्थ्यांचे पर्याय मर्यादित होणार आहेत. आधीच रोजगाराच्या फार कमी उपलब्ध असलेल्या संधीमुळे त्या मर्यादित होणार आहेत.”

“लाखो तरुणांचे भविष्य उध्वस्त करणाऱ्या धोरणाचा अभिमान वाटतो का?”

“विद्यार्थ्यांची मेहनत आणि त्यांचा परीक्षेच्या तयारीसाठीचा मौल्यवान वेळ वाया जाणार आहे. आधी सार्वजनिक क्षेत्रातील नोकरांचे खासगीकरण केले आणि आता हे. एकनाथ शिंदे आणि भाजपा या दोघांना माझा प्रश्न आहे की, लाखो तरुणांचे भविष्य उध्वस्त करू पाहणाऱ्या तुमच्या धोरणाचा तुम्हाला अभिमान वाटतो का?” असा प्रश्न प्रकाश आंबेडकरांनी विचारला.

हेही वाचा : “मोदी भाजपा-आरएसएसच्या गुंडांचे…”; प्रकाश आंबेडकरांचा प्रश्न, म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“वेळापत्रकात बदल न केल्यास विद्यार्थ्यांवर अन्याय”

“पोलीस उपनिरीक्षक परीक्षेसाठी , नगरपरिषदेच्या परीक्षेसाठी आणि महाज्योतीच्या परीक्षेसाठी बहुतांश सारखेच विद्यार्थी तयारी करत असतात. मात्र, या तिन्ही परीक्षा एकाच दिवशी म्हणजे २९ ऑक्टोबरला घेण्यात येणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांपुढे पेच निर्माण झाला आहे. वेळापत्रकात बदल न केल्यास विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ शकतो असे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे मत आहे,” असंही वंचितने नमूद केलं.