डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या न्यायालयीन लढाईत भारिप-बहुज महासंघाचे नेते आणि बाबासाहेबांचे नातू अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची सरशी झाली आहे. रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांचे समर्थक डॉ. गंगाधर पानतावणे व डी. जी़ गांगुर्डे यांना विश्वस्त म्हणून काम करण्यास अपात्र ठरविल्याने आंबेडकर गटाकडे सोसायटीची सूत्रे जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
गेल्या काही वर्षांपांसून पीपल्स सोसायटीवरील वर्चस्वासाठी प्रकाश आंबेडकर व रामदास आठवले गटात वाद सुरू होता. त्यात आनंदराज आंबेडकर यांनीही उडी घेतली. हा वाद न्यायालयात गेला. संस्थेच्या घटनेनुसार गंगाधर पानतावणे व गांगुर्डे विश्वस्त म्हणून काम करण्यास अपात्र आहेत, अशी आंबेडकर यांचे समर्थक एम. एस. मोरे व एस. पी. गायकवाड या दोन विश्वस्तांची तक्रार होती.
मुंबई शहर दिवाणी न्यायालयाने गांगुर्डे व पानतावणे यांना यापूर्वीच विश्वस्त म्हणून काम करण्यास अपात्र ठरविले होते. याला स्थगिती द्यावी, यासाठी ते उच्च न्यायालयात गेले. परंतु बुधवारी न्यायालयाने त्यास नकार दिला, अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली. त्यामुळे आता मोरे व गायकवाड हे दोनच अधिकृत विश्वस्त ठरतात. मात्र या प्रकरणाचा अंतिम निकाल लागेपर्यंत गांगुर्डे व पानतावणे यांना केवळ विश्वस्त म्हणून काम करण्यास मनाई करण्यात आली आहे, अशी माहिती आठवले गटाची बाजु मांडणारे अ‍ॅड. बी. के. बर्वे यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prakash ambedkar takes over peoples society
First published on: 25-07-2014 at 06:27 IST