ज्येष्ठ अभिनेते आणि हिंदी सिनेमाच्या रूपेरी पडद्यावरचे देखणे खलनायक प्राण यांना शुक्रवारी दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. भारतीय चित्रपटांतील बहुमूल्य योगदानाबद्दल केंद्र सरकारतर्फे हा सर्वोच्च चित्रपट पुरस्कार दिला जातो. प्रकृती अस्वास्थ्यामुळे दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्याला प्राण उपस्थित राहू शकले नव्हते. म्हणून शुक्रवारी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री मनीष तिवारी यांनी प्राण यांच्या मुंबईतील निवासस्थानी जाऊन त्यांना पुरस्कार प्रदान करून त्यांचा सत्कार केला. सुवर्णकमळ, मानपत्र, शाल आणि दहा लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
कुर्ता-पायजमामध्ये व्हिलचेअरवर बसलेल्या ९३ वर्षीय प्राण यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या वेळी प्राण यांची कन्या पिंकी आणि मुलगा सुनील व सिकंद परिवारातील अन्य मंडळी उपस्थित होती. प्रथमच अशा प्रकारे पुरस्कारविजेत्यांच्या निवासस्थानी जाऊन केंद्रीय मंत्र्यांनी दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार प्रदान केला गेला. या वेळी  केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री मनीष तिवारी म्हणाले की, प्राणसाहेबांना भेटून त्यांचा गौरव करणे हा व्यक्तिश: माझ्यासाठी भाग्याचा क्षण असून भारतीय सिनेमाच्या शताब्दी वर्षांत प्राण यांना हा पुरस्कार दिला जातोय हीसुद्धा गौरवास्पद बाब आहे.
पाली हिल, वांद्रे येथील प्राण यांच्या निवासस्थानी पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या वेळी केंद्रीय मंत्र्यांसोबत  केंद्रीय माहिती व प्रसारम मंत्रालयाचे सचिव उदय कुमार वर्मा तसेच चित्रपट महोत्सव संचालनालयाचे पदाधिकारीही उपस्थिती होते.
१९६९ साली दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार हा सर्वोच्च चित्रपट पुरस्कार देण्यास केंद्र सरकारने सुरुवात केली. दरवर्षी हे पुरस्कार दिले जातात. प्राण हे या पुरस्काराचे ४४ वे मानकरी ठरले आहेत. हिंदी सिनेमामध्ये आपल्या वैशिष्टय़पूर्ण लकबींसह अनेक खलनायकी छटेच्या तसेच चरित्र व्यक्तिरेखांमध्येही प्राण यांनी आपल्या अभिनयाचे रंग भरले. ३५० हून अधिक सिनेमांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारून त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. १९४० साली रूपेरी पडद्यावर आगमन केल्यानंतर १९९७ सालापर्यंत म्हणजे तब्बल सात दशके रूपेरी पडद्यावर वैविध्यपूर्ण भूमिकांद्वारे प्राण यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला, असे प्राण यांना देण्यात आलेल्या मानपत्रात म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pran receives dadasaheb phalke award at his home
First published on: 11-05-2013 at 03:26 IST