जीवनाच्या विविध क्षेत्रांत काही विशेष करून दाखवणाऱ्या महिलांची ओळख करून देणाऱ्या ‘व्हिवा लाऊंज’ या उपक्रमात काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे वाचकांच्या भेटीला येणार आहेत. उद्या, ९ मे रोजी शिवाजी पार्कजवळील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या सभागृहात दुपारी साडेतीन वाजता मुलाखत व प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून त्यांचा राजकारणातील प्रवास, जडण-घडण याबाबत त्या संवाद साधतील.
राजकारणापासून प्रशासकीय सेवा, खेळ, कला अशा जीवनाच्या विविध क्षेत्रांत कर्तृत्व गाजवून आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या युवती-महिलांच्या जडणघडणीची, त्यांच्या संघर्षांची, परिश्रमांची ओळख ‘व्हिवा लाऊंज’मधून उलगडत असते. विधिमंडळ कामकाजात अत्यंत गांभीर्याने भाग घेणाऱ्या, मतदारसंघातील कामे, कार्यकर्त्यांच्या अडचणी याबाबत अत्यंत जागरूक असणाऱ्या व त्यासाठी सतत मेहनत घेणाऱ्या आमदार म्हणून प्रणिती शिंदे यांची ओळख आहे.
बडय़ा नेत्याची मुलगी म्हणजे राजकारणात आयता व थेट प्रवेश, सारी यंत्रणा दिमतीला असेच समज राजकीय नेत्यांच्या मुला-मुलींविषयी असतात. पण प्रत्यक्षात वस्तुस्थिती काय असते? ‘शिंदेसाहेबांची मुलगी’ ते एक कष्टाळू लोकप्रतिनिधी असा प्रवास करताना काय मेहनत घ्यावी लागली, पहिल्या निवडणुकीचा अनुभव कसा होता? अशा अनेक विषयांवर त्या लोकांशी संवाद साधतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Praniti shinde will open her political travel thru viva lounge today
First published on: 09-05-2013 at 04:07 IST