|| समीर कर्णुक
मुंबईतील महत्त्वाच्या टर्मिनसपैकी एक असलेल्या लोकमान्य टिळक टर्मिनसवर प्रवाशांची होणारी लूट थांबवण्यासाठी प्रीपेड रिक्षा थांबा सुरू करण्यात आला आहे.
एक ते दोन किलोमीटर अंतरासाठी प्रवाशांकडून चारशे ते पाचशे रुपये भाडे आकारण्यात येत असल्याच्या तक्रारी होत्या. प्रीपेड रिक्षामुळे ही लुबाडणूक थांबेल, अशी अपेक्षा आहे. २ ऑक्टोबरपासून हा रिक्षा थांबा प्रवाशांसाठी खुला होईल.
उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, कोकण आणि उत्तराखंड अशा विविध राज्यांमध्ये लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रोज २५ ते ३० गाडय़ांची ये-जा होते. त्यामुळे दिवस-रात्र या टर्मिनसवर प्रवाशांची मोठी गर्दी असते. याचाच फायदा घेत काही रिक्षाचालक गाडी स्थानकावर दाखल होताच, प्रवाशांना गाठण्यासाठी थेट टर्मिनसमध्ये प्रवेश करतात. नव्याने येणाऱ्या प्रवाशांना गाठून त्यांना जबरदस्तीने रिक्षात बसविले जाते. तसेच, मीटरप्रमाणे भाडे न आकारता, त्यांच्याकडून दोन ते पाच किलोमीटर अंतरासाठी चारशे ते पाचशे रुपये उकळले जातात.
वर्षांनुवर्षे सुरू असलेली ही लूट थांबण्यासाठी या ठिकाणी प्रीपेड रिक्षा सेवा सुरू करण्याचा निर्णय परिवहन विभाग आणि रेल्वे अधिकाऱ्यांनी घेतला आहे.
गुरुवारी याबाबत परिवहन अधिकारी, रिक्षा संघटना, वाहतूक पोलीस आणि रेल्वे अधिकारी यांच्यात बैठक पार पडली. यामध्ये येत्या २ ऑक्टोबरपासून ही सेवा याठिकाणी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
प्रीपेड सेवा अशी आहे..
लोकमान्य टिळक टर्मिनसवरून या आधीही प्रीपेड टॅक्सी सेवा सुरू करण्यात आली आहे. प्रवाशांना इच्छित स्थळी जाण्यासाठी रिक्षात बसण्यापूर्वी या ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या केंद्रामध्ये पैसे जमा करावे लागणार आहेत. त्यामुळे प्रवाशांची होणारी लूट मोठय़ा प्रमाणात कमी होईल. यामध्ये लवकरच मोबाइल अॅपदेखील सुरू करणार असल्याची माहिती एका रेल्वे अधिकाऱ्याने दिली.