चणाडाळीचे दर कमी असल्याने तयार लाडूच्या किमती आटोक्यात; चकल्या, शेवही स्वस्त
चणाडाळीसह सर्वच डाळींच्या किमतींनी उच्चांक गाठल्याने गतवर्षी दिवाळीच्या फराळात हात आखडता घेणाऱ्या ग्राहकांची यंदाची दिवाळी सुसह्य होण्याची चिन्हे आहेत. गतवर्षी दीडशे रुपयांवर पोहोचलेली चणाडाळ सध्या ८५-९० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. याचा सर्वात मोठा परिणाम बेसनाच्या लाडूंच्या किमतीवर झाला असून गतवर्षीच्या तुलनेत एका लाडूचा दर पाच ते सात रुपयांनी कमी झाला आहे. दुसरीकडे डाळींचे दर नियंत्रणात असल्याने भाजणी चकली, शेव यांच्या दरांतही काहीशी घसरण झाल्याचे दिसून येत आहे.
गेल्या वर्षी ऐन दिवाळीच्या दिवसात डाळींच्या किमती दुपटीने वाढल्यामुळे तयार फराळ्याच्या किमती ४० ते ५० रुपयांची वाढल्या होत्या. त्यामुळे बेसनाचा लाडू, विविध प्रकारची शेव, भाजणी चकली, कडबोळी याच्या किमती वाढल्या होत्या. यंदा मात्र डाळींच्या किमती ८५ ते ९० रुपये किलोपर्यंत घसरल्याने दिवाळी फराळातील डाळींचा समावेश असलेल्या पदार्थाच्या किमती कमी झाल्या आहेत. गेल्या वर्षी बेसनाच्या एक नग लाडवामागे २२ ते २५ रुपये आकारले जात होते. मात्र यंदा या किमती १८ ते २० रुपयांपर्यंत पोहोचल्या आहेत. तर गेल्या वर्षी १ किलो भाजणीची चकली ३५० ते ४२० रुपयांपर्यंत पोहोचली होती. सध्या यांची किंमत ३०० ते ३६० रुपयांपर्यंत घसरली आहे.
जीएसटीमुळे स्वस्ताई कमी
गतवर्षीच्या तुलनेत यंदा फराळांचे दर कमी असले तरी, वस्तू आणि सेवा कराच्या आकारणीमुळे दरांतील घसरण कमी झाली आहे. यापूर्वी चिवडा किंवा नमकीनवर ६ टक्के व्ॉट घेतला जात होता. मात्र आता या पदार्थावर १२ टक्के जीएसटी आकारला जात आहे, असे फॅमिली स्टोअर्सचे शेखर जोशी यांनी सांगितले. जीएसटीमुळे व्यवसायावर काही प्रमाणात परिणाम झाला असून यंदा परदेशात फराळ पाठविण्याची सेवा देणार नसल्याचे दादर येथील बेडेकर दुकानाचे मालक अमित बेडेकर यांनी सांगितले. नोकरदारवर्गातील महिलांना दिवाळीचे फराळ तयार करण्यासाठी वेळ देणे शक्य होत नाही. मात्र सणाच्या दिवशी घरात फराळ तयार करावे अशी अनेकांची इच्छा असते. यासाठी सध्या बाजारात तयार सुक्या खोबऱ्याचा कीस, करंजीचे तयार पूरण, तयार शेव पीठ, चकली भाजणी, भाजलेल्या बेसन लाडवाचे पीठ या पदार्थाची मागणी चांगलीच वाढत आहे. बेसनाचे लाडू तयार करणे सोपे व्हावे यासाठी तयार भाजलेले पीठ बाजारात उपलब्ध आहे. साखर, तूप, वेलची पूड घातल्यानंतर केवळ लाडू वळण्याचे काम करावे लागते. सध्या बाजारात तयार शेव पीठ ही विकले जात आहे. तर करंजीचे तयार पूरणही ग्राहकांसाठी उपलब्ध आहे, असे फॅमिली स्टोअर्सच्या कला जोशी यांनी सांगितले.