सर्व प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीसाठी सज्ज असल्याचा पालिकेचा उच्च न्यायालयात दावा
मुंबई : पावसाळ्यात सर्व प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीसाठी पालिका सज्ज असून लोकांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव सर्वप्रकारे तयारी करण्यात आल्याचा दावा मुंबई पालिकेने गुरूवारी उच्च न्यायालयात केला. एवढेच नव्हे, तर मुसळधार पावसामुळे अडकून पडलेल्या लोकांसाठी जेवण आणि आवश्यक त्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्याचीही सोय यंदा करण्यात आली असून त्यासाठी काही उपाहारगृहे, रूग्णालयांशी करारही करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
पाणी साचण्याची शक्यता असलेल्या भागांमध्ये पाणी उपसा करणारे पंप बसवण्यासह याच परिसरातील सगळी भुयारी गटारे (मॅनहोल) जाळी बसवून सुरक्षित करण्यात आली असल्याचा दावाही पालिकेतर्फे करण्यात आला. मात्र डॉ. दीपक अमरापूरकर यांच्याबाबत झालेल्या दुर्दैवी घटनेची पुनरावृत्ती होऊ नये ही आमची अपेक्षा असल्याचे न्यायालयाने पालिकेला सुनावले.
गेल्या वर्षी मुसळधार पावसामुळे मुंबईत पूरसदृश्य स्थिती निर्माण होऊन मुंबई ठप्प झाली होती. याच पावसात घरी जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या डॉ. अमरापूरकर यांचा उघडय़ा भुयारी गटारात पडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी व्यापाऱ्यांच्या एका संघटनेने जनहित याचिका केली होती. तसेच मुंबईतील भुयारी गटारे पावसाळ्यात कशाप्रकारे मृत्यूचे सापळे बनतात हा मुद्दा न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला होता. शिवाय ही भुयारी गटारे सुरक्षित करण्याच्या दृष्टीने पालिकेला आदेश देण्याची मागणी याचिकेत करण्यात आली होती. न्यायालयाने पालिकेला याप्रकरणी प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी शेवटची संधी दिली होती.
गुरूवारी झालेल्या सुनावणीत पालिकेच्या वतीने प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले तसेच यंदाच्या पावसाळ्यात उद्भवणाऱ्या सगळ्या नैसर्गिक आपत्तीसाठी पालिका सज्ज असल्याचा दावा करण्यात आला. या आपत्तींना सामोरे जाण्यासाठी काय प्रतिबंधात्मक उपाय करण्यात आलेले आहेत याचा तपशीलही े न्यायालयात मांडण्यात आला. त्यावर पालिकेने सुरक्षिततेसाठी आणखीन चांगले उपाय करण्याची गरज आहे. डॉ. अमरापूरकर यांच्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून पालिकेने उघडय़ा भुयारी गटारांसाठी प्रभाग पातळीवरील अधिकाऱ्याला जबाबदार धरण्याचा विचार करण्याची सूचना न्यायालयाने केली.
* मुंबईतील पाणी साचणाऱ्या भागांमध्ये पाणी उपसा करणारे पंप बसवण्यात आले असून या परिसरातील १ हजार ४२५ भुयारी गटारे ही जाळी लावून सुरक्षित करण्यात आलेली आहेत.
* कुठलेही भुयारी गटार उघडे ठेवले जात नाही. परंतु त्यानंतरही भुयारी गटार उघडे असल्याचे आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित प्रभाग अधिकाऱ्याला संपर्क साधून त्याला त्याबाबत कळवावे. त्यानंतर लगेचच ती बंद केली जातील. मुसळधार पाऊस कधी पडणार आहे याचबरोबर कुठे पाणी साचले आहे, भरती कधी आहे, पावसामुळे अडकून पडल्यास कुठे आश्रय घेता येऊ शकेल याची नागरिकांना तपशीलवार माहिती देण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे विशेष ‘अॅप’ उपलब्ध करण्यात आले आहे.
* अडकलेल्या लोकांना जेवण तसेच आवश्यक ती वैद्यकीय सुविधा उपलब्ध होईल यासाठी उपहारगृहे आणि रूग्णालयांशी करार करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे रेल्वे स्थानक, झोपडपट्टय़ांमध्ये जाऊन जेवण उपलब्ध करू, असा दावाही पालिकेतर्फे करण्यात आला.