ठाणे जिल्हा विभाजनावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये पुन्हा एकदा धुसपूस सुरू झाली आहे. निवडणुकीच्या तोंडावर जिल्हा विभाजनासाठी काँग्रेसने मुख्यमंत्र्यांवर दबाव आणला असला तरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रखर विरोधामुळे पुन्हा एकदा जिल्हा विभाजनाचे घोडे अडले आहे.
ठाणे जिल्हयाचे विभाजन करून पालघर हा नवीन जिल्हा घोषित करावा, यासाठी काँग्रेसचे प्रयत्न सुरू आहेत. पालघर लोकसभा मतदारसंघातून गेल्या निवडणुकीत काँग्रेसला पराभवाचा धक्का बसला होता. मात्र यावेळी ही जागा जिंकण्यासाठी काँग्रेसने आदिवासी विकास राज्यमंत्री राजेंद्र गावित यांना मैदानात उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच पालघर जिल्ह्याची घोषणा करुन मदारसंघात अनुकूल वातावरण तयार करण्याचे काँग्रेसचे प्रयत्न आहेत. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बठकीत काँग्रेसच्या मंत्र्यांनी ठाणे जिल्हा विभाजनाची जोरदार मागणी केली. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी पालघर जिल्हा घोषित करण्यासाठी या मंत्र्यांनी आग्रह धरला. मुख्यमंत्रीही त्यास अनुकूल होते. मात्र या बठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा विभाजनाला जोरदार विरोध केला.
ठाणे जिल्हा परिषदेवर सध्या राष्ट्रवादीची सत्ता आहे. परंतु, नव्याने तयार होणाऱ्या पालघर जिल्ह्यात राष्ट्रवादीची फारशी ताकद नाही. त्या भागात बहुजन विकास आघाडीबरोबरच शिवसेना, भाजपाचीही ताकद आहे. त्यामुळे नव्या जिल्ह्यात राष्ट्रवादीला सत्ता मिळणे अवघड आहे. जिल्हा विभाजनाचा निर्णय सरकारने घेतल्यास जिल्हा परिषद बरखास्त करून पुन्हा निवडणुका घ्याव्या लागतील.
जिल्हा परिषद निवडणुकीला अजून तीन वर्षांचा अवकाश असताना सत्ता सोडून निवडणुकांना सामोरे जाण्याचीही राष्ट्रवादीची तयारी नाही. त्यामुळे तूर्तास हे विभाजन नको, अन्य जिल्ह्यांच्या विभाजनाचाही प्रस्ताव एकाच वेळी आणा अशी भूमिका पवार यांनी बैठकीत घेतल्याने हा निर्णय तूर्तास लांबल्याचे समजते.