मुंबई: राज्यात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संघटनेच्या महाराष्ट्रातील सरचिटणीसासह ४७ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. मुंबईतही पवई पोलिसांनी पीएफआय एका पदाधिकाऱ्याला प्रतिबंधात्मक अटक केली. पीएफआयविरोधात राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) करत असलेल्या कारवाईविरोधात तो ट्वीट करत असल्याचा आरोप आहे. तसेच सरकारविरोधी व धार्मिक तेढ निर्माण होईल, अशी आक्षेपार्ह पोस्टही त्याने रिट्वीट केल्याचा आरोप आहे. पीएफआयशी संबंधित कार्यकर्त्यांवर देशभरात एनआयएकडून कारवाई होत असताना राज्य पोलिसांनीही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबाद, पुणे, मुंबई, ठाणे, नांदेड, परभणी, मालेगाव, अमरावती अशा विविध ठिकाणी ४७ जणांना अटक करण्यात आली आहे. त्याशिवाय काही व्यक्तींकडून गैरप्रकार न करण्याचे हमीपत्र लिहून घेण्यात आले आहे. काही जणांना नोटीस बजावण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.  मुंबईतही मंगळवारी प्रतिबंधात्मक कारवाईअंतर्गत पीएफआयच्या पदाधिकाऱ्याला अटक करण्यात आली. राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) २२ सप्टेंबरला पीएफआयविरोधात देशभर केलेल्या कारवाईविरोधात संघटनेचे सदस्य समाजमाध्यमांवर आक्षेपार्ह पोस्ट करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या  आधारे पवई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुंबई आयआयटी मुख्य द्वारासमोरील हनुमान रोड परिसरात राहणारा पीएफआयचा महाराष्ट्र सरचिटणीस सईद अहमद सरदार अहमद खान याला अटक केली. खान हा  राज्य सरचिटणीस, तसेच वित्त विभागाचा प्रभारीही असल्याची माहिती सूत्रांनी दिली.